ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेने पाकिस्तानचा १ धावाने पराभव केला आहे. पर्थ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला १३१ धावांचे आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानाच्या फलंदाजांची दमछाक झाली. १३० धावांमध्येच पाकिस्तानला आपला खेळ गुंडाळावा लागला. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे.
झिम्बाब्वेने प्रथन नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेकडून कोणत्याही फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. शॉन विल्यम्स याने सर्वाधिक ३१ धावा केल्या. झिम्बाब्वेने २० षटकात १३० धावांचे आव्हान पाकिस्तानला दिलं होतं. मात्र, झिम्बाब्वेच्या गोलंदाजासमोर धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची पळताभूई झाली.
हेही वाचा : झिम्बाब्वेच्या संघातून खेळणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने मिळवून दिला विजय; ठरला सामनावीर
पाकिस्तानच्या पराभवानंतर समाजमाध्यमांत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये पाकिस्तानला ‘मिस्टर बीन’ म्हणत सेहवागने खिल्ली उडवली आहे. झिम्बाब्वेच्या एका चाहत्याने केलेलं ट्विट रिट्विट करत सेहवाग म्हणाला की, “भाऊ खोटारड्या मिस्टर बीन पाकिस्तानचा तुमच्या संघाने काय बदला घेतला आहे.”
दुसऱ्या ट्विटमध्ये सेहवागने झिम्बाब्वेच्या फलंदाजीनंतर पाकिस्तानची स्थिती आणि पाकिस्तानच्या फलंदाजीनंतरची स्थिती, असं दर्शवलं आहे. दरम्यान, सेहवागचे हे दोन्ही ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
पाकिस्तानच्या परभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्रानेही ट्विट करत जखमेवर मीठ चोळलं आहे. “हा पराभव नाराजी करणारा नाही. हा नेहमीच झिम्बाब्वेचा सामना होता. शेजाऱ्यांसाठी आजचा वाईट दिवस आहे,” असं अमित मिश्राने म्हटलं आहे.