Bhuvneshwar Kumar On Rohit Sharma Captaincy: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा स्विंग गोलंदाजीचा बादशाह म्हणून ओळखला जातो. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या भुवनेश्वर कुमारकडे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा देखील अनुभव आहे. भारतात असो की परदेशात त्याने नेहमीच भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. २०२२ मध्ये तो शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. आता एका मुलाखतीत त्याने रोहित शर्माचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
भुवनेश्वर कुमार आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. पण लवकरच तो युपी टी -२० लीग स्पर्धेत लखनऊ फाल्कन्स संघाकडून खेळताना दिसेल. या स्पर्धेला येत्या १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भुवनेश्वर कुमारने रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
भारताचा वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी -२० आणि कसोटी क्रिकेटला रामराम केलं आहे. तो आगामी २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे. रोहित शर्माचं कौतुक करताना भुवनेश्वर कुमार म्हणाला, “ रोहित शर्मा हा परिपक्व कर्णधार आहे. ज्याला आपल्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी कशी करून घ्यायची हे चांगलं माहित आहे. संघातील खेळाडूंचा मजबूत पक्ष त्याला चांगलाच माहित आहे आणि त्याचा योग्य वापरही तो करून घेतो. तो माझ्याशी एका सामान्य मित्रासारखाच बोलतो.”
फलंदाजीत हिट असलेल्या रोहित शर्माने नेतृत्वातही दमदार कामगिरी केली आहे. रोहितने १४२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान त्याने १०३ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. तर ३३ सामने गमावले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने २४ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान १२ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर ९ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६२ सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान ४९ सामन्यात भारतीय संघाने विजयाची नोंद केली आहे.