ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ‘बिग बॅश लीग’मध्ये दररोज काहीतरी रोमांचक प्रसंग पाहायला मिळत आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हटलं की वेस्ट इंडिजचे खेळाडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चे असतात. ‘बिग बॅश लीग’मध्येही वेस्ट इंडिजचे खेळाडू विविध कारणांसाठी चर्चेचे केंद्रस्थान बनले आहेत. नुकतेच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेलाडू ड्वेन ब्राव्हो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला चक्क स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर न्यावे लागले. तर दुसरीकडे आंद्रे रसेल याने मालिकेत आपल्या बहुरंगी बॅट्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यात ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिन याने तब्बल १२१ मीटर लांब विक्रमी षटकार देखील ठोकला होता. आता वेस्ट इंडिजचा आणखी एक खेळाडू ‘बिग बॅश लीग’मधील सामन्यात चर्चेचा विषय ठरला. किरॉन पोलार्डच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी संघातील केव्हीन पीटरसन याने फलंदाजी करण्यास नकार दिला.

‘बिग बॅश लीग’मध्ये ‘मेलबर्न स्टार्स’ आणि ‘एडलेट स्ट्रायकर्स’मधील सामन्यात हा प्रकार घडला. किरॉन पोलार्ड याने आपल्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने पूर्णपणे पट्टी बांधली होती. मेलबर्न स्टार्सचा फलंदाज केव्हीन पीटरसन याने पोलार्डच्या या कृतीवर आक्षेप घेतला. हाताला पट्टीबांधून पोलार्डचा विचलीत करण्याचा संशय पीटरसनला आला आणि त्याने पंचांकडे याबद्दलची तक्रार केली. मग पचांनी पोलार्डच्या हातावरील पट्टीची विचारणा त्याच्याकडे केली. पोलार्डने आपल्या हाताला झालेल्या दुखापतीची माहिती देत आपली बाजू मांडली. पंचांनी पोलार्डच्या स्पष्टीकरणावर सहमती दाखवली. तसेच पोलार्डने पीटरसन यालाही आपल्या हाताला झालेली दुखापतीची माहिती दिली. त्यानंतर पुन्हा खेळा पूर्ववत करण्यात आला. पीटरसन देखील पोलार्डच्या स्पष्टीकरणावर संतुष्ट असल्याचे दिसले. १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया मेलबर्न स्टार्स संघाने सामना २ विकेट्सने जिंकला. बेन हिल्फेनहॉस याने आठव्या स्थानावर दमदार फलंदाजी करून संघाला विजय प्राप्त करून दिला.