ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी काही खेळाडूंना हा सराव सामना म्हणजे चांगले व्यासपीठ ठरू शकेल, असे मत भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले आहे.
‘‘प्रत्येक खेळाडूला कामगिरी दाखवून पुढे वाटचाल करण्याची ही संधी असेल. प्रत्येक खेळाडू पाहुण्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. कारण हे मोठे व्यासपीठ उपलब्ध आहे, याची प्रत्येकाला जाणीव आहे,’’ असे राजपूत यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात परवेझ रसूलने चांगली गोलंदाजी केली आणि प्रत्येक जण त्याच्या गुणवत्तेविषयी बोलू लागला. काही खेळाडूंना भारतीय संघात परतण्यासाठी ही चांगली संधी असेल. त्यामुळे ते गांभीर्याने या सामन्यात कामगिरी करतील,’’ असे राजपूत यांनी सांगितले.