मैदानातील अफलातून क्षेत्ररक्षणामुळे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेला मोजक्या खेळाडूंमध्ये मोहम्मद कैफला डावलता येणार नाही. रॉबिन सिंगनंतर भारतीय संघातील चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीशिवाय क्षेत्ररक्षण हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. मोहम्मद कैफने आपल्या कारकिर्दीत या क्षेत्रातील जबाबदारी लीलया पेलली. क्षेत्ररक्षणाशिवाय संघाच्या मध्यफळीची जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर होती. २००२ मध्ये रंगलेला नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामना ज्यांच्या लक्षात आहे, तो क्रिकेटप्रेमी मोहम्मद कैफची खेळी आजही विसरला नसेल. मोहम्मद कैफने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी या सामन्यात केली होती. त्याच्या आणि युवराज सिंगच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा ३२५ धावांचा डोंगर सर केला होता. या विजयानंतर भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्डसच्या मैदानावर शर्ट काढून फ्लिंटॉपच्या कृतीची परतफेड केली होती. यापूर्वी इंग्लंडने भारताला मायदेशात पराभूत केल्यानंतर फ्लिंटॉफने मैदानात शर्ट काढून आनंद व्यक्त केला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यात १३ जुलै २००२ मध्ये लॉर्डसच्या मैदानावर अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३२५ धावांचा डोंगर रचला होता. या धावसंख्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीने दमदार सुरुवात केली. सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी शतकी भागीदारी रचून भारतीय संघ इंग्लंडचे आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. मात्र, ही जोडी फुटल्यानंतर भारताची फलंदाजी अक्षरश: कोलमडली.
५ बाद १४६ धावा असताना कैफ आणि युवराज यांनी भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. युवराज सिंग अर्धशतक झळकावल्यानंतर मोहम्मद कैफनं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. कैफने या सामन्यात १०९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं नाबाद ८७ धावांची खेळी केली होती.
मोहम्मद कैफनं १२५ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात त्याने २७५३ धावा केल्या असून, यात २ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. तर १३ कसोटीत एक शतक आणि ३ अर्धशतकासह त्याने ६२४ धावा केल्या आहेत.