एक्स्प्रेस वृत्तसेवा, लखनऊ : कुस्ती लढती सुरू होण्यास होणारा उशीर नवा नाही; पण चालू लढत स्थगित करणे, हे नक्कीच नवे आहे. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी महिलांच्या निवड चाचणीदरम्यान ५९ किलो वजन गटातील लढत अचानक थांबवण्यात आली. जागतिक स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक अनुभवी पूजा धांडा आणि तिची प्रतिस्पर्धी मानसी यांच्यातील लढत चालू होती; परंतु प्रतिस्पर्धी कुस्तीगीर जखमी झाले म्हणून किंवा कुठली तांत्रिक अडचण आली नाही म्हणून नाही, तर अयोध्येतील साधूंचा आशीर्वाद घेण्यासाठी ही लढत थांबवण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निवड चाचणीसाठी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषणसिंह शरण यांनी अयोध्येतील काही साधूंना आमंत्रित केले होते. त्यांना लढत सुरू होण्यापूर्वी मल्लांना आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करण्यास आयोजक विसरले. लढत सुरू झाल्यावर शरण यांना हे लक्षात आले आणि त्यांनी पंचांना लढत थांबवण्यास सांगितले.

या लढतीसाठी बोलावण्यात आलेले साधू हे हनुमान गढ मठातील होते. लढत स्थगित करीत मल्लांना आशीर्वाद देण्यात आले. त्यांच्याबरोबर छायाचित्रणही झाले. या वेळी मल्ल एक वेळ बाजूला राहिले आणि अनेक उत्साही कार्यकर्त्यांची छायाचित्रासाठी गर्दी झाली. त्यानंतर मग यथावकाश लढत सुरू झाली. मानसीने पूजाचा २-० असा पराभव करून भारतीय संघात स्थान मिळवले.

अन्य लढतीत विनेश फोगटने २०  वर्षांखालील जागतिक विजेती अंतिम पंघालचा पराभव केला. राष्ट्रकुल विजेत्या साक्षी मलिकने विश्रांतीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे चाचणीत सहभाग घेतला नाही. तिची जागा सोनम मलिकने घेतली.

  • जागतिक स्पर्धेसाठी संघ – महिला : विनेश (५३ किलो), सुषमा शौकिन (५५ किलो), सरिता (५७ किलो), मानसी (५९ किलो), सोनम (६२ किलो), शेफाली (६५ किलो), निशा (६८ किलो), रितीका (७२ किलो), प्रियांका (७६ किलो) ५० किलोसाठी पुन्हा चाचणी होणार; पुरुष : फ्रीस्टाईल : रवी कुमार (५७ किलो), पंकज (६१ किलो), बजरंग (६५ किलो), नवीन (७० किलो), सागर जालान (७४ किलो), दीपक (७९ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), विकी (९२ किलो), विकी (९७ किलो), दिनेश (१२५ किलो), ग्रीको-रोमन : अर्जुन हलाकुर्की (५५ किलो), ग्यानेंद्र (६० किलो), नीरज (६३ किलो), आशु (६७ किलो), विकास (७२ किलो), सचिन (७७ किलो), हरप्रीत सिंग (८२ किलो), सुनील कुमार (८७ किलो), दिपांशु (९७ किलो), सतिश (१३० किलो)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blessings sadhus ayodhya wrestling matches world championship wrestling ysh
First published on: 31-08-2022 at 02:41 IST