मॉडेल लोक रॅम्पवर चालतात तेव्हा त्यांची प्रत्येक हालचाल, दिसणे, देहबोली यातून त्यांचे अत्यंत रेखीव आणि आल्हाददायक रूप प्रकट व्हावे, हा हेतू असतो. त्या रॅम्पवर त्यांची जितका वेळ उपस्थिती असते तितका वेळ छायाचित्रकार प्रत्येक क्षण टिपायचा प्रयत्न करतात. त्यांची प्रत्येक अदा उपस्थित रसिकांना संमोहित करून टाकते.
रोहित शर्मा जेव्हा भरात असतो, तेव्हा तो खेळपट्टी नावाच्या रॅम्पवर बॅटिंगचे मॉडेलिंग करतो असे वाटते. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो ती वेळ(टायमिंग), शॉट मारतानाची शरीरस्थिती आणि शॉट मारून झाल्यावरची शरीर स्थिती (फॉलो थ्रू) हे पाहिल्यावर अद्वितीय काव्यरचनेला जशी बेभान उत्स्फूर्त दाद दिली जाते, तशी दिली गेली नाही तर आपली क्रिकेट साधना कमी पडते आहे, असे समजायला हरकत नाही.
खरेतर रोहित शर्माच्या बॅटिंगचे निवांत आणि वेल्हाळ रसग्रहण व्हायला हवे. त्याच्या शैलीत लोकांना लक्ष्मण दिसतो. (आपल्याकडे लालित्यपूर्ण फलंदाजीकरता फक्त लक्ष्मणचा निकष असतो) आपण सूक्ष्मपणे रोहितची फलंदाजी पाहिली की लक्षात येते त्याची तुलना कोणाशीही करणे योग्य नाही. त्याचे ड्राइव्हज विश्वनाथ, गावसकर, सचिन यांच्यासारखे आहेत, असं आपण म्हणू शकतो. पण तो षटकार मारतो तेव्हा सुद्धा शर्टाची इस्त्री बिघडत नाही, बॅट अतिशय रेखीव कोनातून फिरते. तो चेंडूवर केलेला हल्ला नसतो. तर ते ऐनवेळेस अलगद उघडलेले पॅराशूट असते.
रोहित म्हणतो की ‘मी भिन्न काही करत नाही.’ पण मला खात्री आहे की त्याने बॅटिंगचा कला म्हणून रियाझ केला आहे. बॅटिंग मधल्या कुणाच्यातरी कलाकारीवर तो भारावलेला असणार आणि बॅटिंग करायची तर अशी ही खूणगाठ त्याने बांधलेली असणार. मला वैयक्तिकपणे रोहितची फलंदाजी सर्वाधिक मार्क वॉच्या जवळची वाटते. ऑफ आणि लेग दोन्ही बाजूचे लालित्य, कमालीची सहजता, बॅटच्या मधोमध झालेला चेंडूंचा संपर्क आणि मनगटाच्या छोट्याशा परिभ्रमणातून अगदी शेवटच्या क्षणाला मिडविकेट किंवा स्क्वेअरलेगची सीमारेषा दाखवणारा पीकअप शॉट हे सर्वाधिक मार्क वॉच्या जवळचं वाटतं. काल इंदौरच्या सामन्यात रोहितने अदाकारी पेश केली तेव्हा मार्क वॉ पॅव्हिलियनमध्ये बसला होता. तो स्वतःचे प्रतिबिंब रोहितमध्ये निश्चित पाहात असणार.
काल त्याने एक षटकार स्टेडियमच्या बाहेर मारला. तो सुद्धा कमीतकमी शारीरिक हालचालीने. श्रम हा शब्द त्याच्या कोशात नाही. त्याला जिममध्ये एकदा वेट लिफ्टिंग करताना पाहिलं पाहिजे. वजन ऑटोमॅटिक वर जातंय, असं दृश्य दिसण्याची शक्यता आहे.
असा टॅलेंट परमेश्वराच्या लहरीतून निर्माण होतो. त्याला सातत्याचे, शिस्तीचे निकष लावू नयेत हेच खरे. कसोटी सामन्यात असे कलंदर लोक लवकर बोअर होतात. दहा चेंडूत एकही चौकार मिळाला नाही तर यांची सहनशीलता संपते. आपणही आता रोहितचे लालित्य मर्यादित षटकांपुरते पाहायला मिळणार ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे असे दिसते. पण जी फलंदाजी बघायला मिळते ती अलौकिक!
क्यूँ की रोहित का अंदाज-ए-बयाँ है और…
– रवि पत्की
sachoten@hotmail.com