भारतीय संघाने अश्विन आणि जडेजा यांना विश्रांती देऊन चहल आणि कुलदीप यादवला खेळवण्याचा प्रयोग सुरू केला. असा प्रयोग आवश्यक होता. लेफ्ट आर्म स्पिनर आणि ऑफ स्पिनर हे कसोटी सामन्यात अजूनही परिणामकारक आहेतच. खरेतर फलंदाजांच्या उत्तम तंत्राच्या आणि संयमाच्या अभावामुळे कोणताही बऱ्यापैकी स्पिनर आजकाल कसोटी सामन्यात दहशत निर्माण करतो. मोईन अली हे त्याचे उत्तम उदाहरण. सरासरी गुणवत्तेच्या थोड्या वरच्या गुणवत्तेचा हा स्पिनर प्रत्येक डावात तीन ते चार विकेट्स घेतोच. प्रश्न निर्माण झाला आहे मर्यादित षटकातील आणि त्यातही टी-२० सामन्यात फलंदाजांना कसे रोखायचे याचा.
पाटा खेळपट्ट्या, पहिली पाच ते सहा षटकेच स्विंग होणारा पांढरा चेंडू, पॉवर प्लेचे फलंदाजधार्जिणे नियम, चेंडूला सहज फेकून देणाऱ्या वजनदार आणि जास्त लाकूड असलेल्या बॅट्स (बॅट्स कसल्या भीमाच्या गदाच आहेत त्या) अशा परिस्थितीत केवळ चेंडू टाकायला कोणीतरी हवा म्हणून गोलंदाज घेतला जातो, असे चित्र निर्माण झाले आहे. वन डेमध्ये ३५० आणि टी-२० मध्ये २०० धावा हे रुटीन झाले आहे. यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्याकरता आपली गोलंदाजी सगळ्या विपरीत परिस्थितीत देखील विकेट्स कशा काढेल याचा सर्वत्र विचार चालू आहे.
या सगळ्या प्रयत्नात क्रिकेटमधल्या धुरिणांना अखेर असे लक्षात आले आहे की रिस्टस्पिनरला पाटा खेळपट्टयांवरसुद्धा चेंडू थोडातरी वळवता येतोय आणि गुगली, फ्लिपर यासारख्या विविधतेने फलंदाज चेंडू भिरकवण्याच्या आधी विचार करतोय. अनेक वेळेस चाचपडतोय तर अनेकदा चेंडूची चालचलन न कळल्यामुळे बाद होतोय. त्यामुळे उजव्या आणि डाव्या हाताने रिस्ट स्पिन टाकणाऱ्या गोलंदाजांना गणपतीच्या आदल्यादिवशी तांबड्या कमळाला येतो तसा भाव आलाय. क्रिकेटच्या दृष्टीने ही अतिशय आंनददायी गोष्ट. क्रिकेटमध्ये आऊट स्विंग जे दृष्टीसुख देतो तेच लेगस्पिन देतो.
आता महत्वा्चा प्रश्न असा रहातो की की तुमच्या लेगस्पीनरचा दर्जा काय आहे हा. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या वन डेमध्ये अखिला दनंजया या लेग स्पिनरने भारतीय फलंदाजांची गाळण उडवली. सहा भारतीय फलंदाज संमोहनाचा सेशन चालू असल्यासारखे बधीर झाल्याचे दिसले. रिस्ट स्पिनरच्या युक्तींच्या पोतडीतून त्याने सर्व एकसे एक चिजा बाहेर काढल्या आणि भारतीय फलंदाज आ वासून पाहात राहिले. त्याचे दोन गुगली आहेत. एक हाताच्या अॅक्शन वरून कळणारा आणि दुसरा जवळजवळ लेग स्पिनच्या अॅक्शनने टाकलेला. या दुसऱ्या गुगलीने कोहली, जाधव, राहुल सगळे फसले. पंड्या गुगलीसाठी खेळायला गेला तर तो लेग स्पिन होता आणि कहर म्हणजे अक्षर पटेलला त्याने अनपेक्षित ऑफस्पिन टाकून पायचित पकडले. हेच ते गोलंदाजीतले रहस्य. असा रहस्यमय गोलंदाज असेल आणि पोतडीतल्या जादूंवर हुकमत असेल तर रिस्ट स्पिनर मजा आणतो आणि दाणादाण उडवतो. अजंता मेंडिसने कॅरम बॉलवर तर मुरलीने त्याच्या आगळ्यावेगळ्या पण वैध शैलीने फलंदाजांच्या झोपा उडवल्या. गोलंदाजाच्या अॅक्शनवरून बॉल कळत नसेल आणि त्यामुळे फलंदाज खेळपट्टीवर चेंडू पडल्यावर अंदाजाने खेळत असेल तर त्याची अवस्था बघवत नाही.
रिस्ट स्पिनर क्रिकेटला वैभवशाली बनवतात. रिस्ट स्पिनरला बघण्याचा रोमांच वेगळाच. फक्त तो रहस्यमय असला पाहिजे नाहीतर तो इतक्या धावा देतो की ती अंगाशी आलेली चैन ठरू शकते. भारतात नवीन रिस्ट स्पिनर बघायला मिळतायत. त्यांनी फलंदाजांची भंबेरी उडवावी ही अपेक्षा.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com