दक्षिण आफ्रिकेचा ऑलिम्पिक ‘ब्लेडरनर’ ऑस्कर पिस्टोरियस याच्या घरातून पोलिसांना रक्ताने माखलेली बॅट सापडल्याचे वृत्त येथील एका वृत्तपत्राने दिले आहे. ऑस्कर याच्यावर आपली प्रेयसी रीव्हा स्टीनकॅम्प हिची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या हत्येप्रकरणी तपास अधिकाऱ्यांना ऑस्कर याच्या प्रिटोरिया येथील घरातून रक्ताने माखलेली बॅट मिळाली आहे. रीव्हा हिच्या मेंदूचा चेंदामेंदा झाल्याचे वृत्त येथील एका वृत्तपत्राने दिले आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी रीव्हा हिची चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तिने बचावासाठी या बॅटीचा उपयोग केला होता काय, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. चोर समजून ऑस्करने तिच्यावर गोळ्या झाडल्या हा निष्कर्ष तपास अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे. त्यांच्या मतानुसार ज्यावेळी रीव्हाची हत्या झाली, त्यावेळी तिच्या अंगात नाईटगाऊन होता. तिच्यावर पहिली गोळी झाडल्यानंतर ती बेडरुममधून स्वच्छतागृहात लपली. तेथे तिच्यावर उर्वरित तीन गोळ्या झाडण्यात आल्या असाव्यात.
एजंटाकडून ऑस्करकडे पाठ
ऑस्कर याला प्रेयसीच्या हत्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आल्यानंतर ऑस्करच्या एजंटांनी त्याच्याबरोबर केलेले प्रायोजकत्वाचे करार रद्द करण्यास सुरुवात केली आहे. रिओ येथे २०१६ च्या ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक स्पर्धाच्या प्रचाराचा एक भाग म्हणून ऑस्कर व त्याचा ब्लेडरनर प्रतिस्पर्धी अ‍ॅलन सिक्वेरा हे दोघेही पुढील महिन्यात प्रदर्शनीय शर्यत करणार होते. या शर्यतीसंदर्भात ऑस्करच्या एजंटांनी काही प्रायोजकांबरोबर करार केले होते. हे करार रद्द होण्यास सुरुवात झाली आहे.