यंदाच्या रणजी हंगामात मुंबईला आपला पहिला सामना खेळण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा कर्णधार आदित्य तरे मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाहीये. आदित्य तरेच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. आदित्य तरेची बायको गरोदर असून येत्या काही दिवसात आदित्यच्या घरात नवा पाहुणा येणार आहे. त्याच्या स्वागतासाठी आदित्यने सध्या आपल्या पत्नीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्यची ही विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनने मान्य केल्याचंही समजतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१७-१८ हंगामातला मुंबईचा पहिला रणजी सामना हा १४ ऑक्टोबरपासून मध्य प्रदेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबईचे मातब्बर खेळाडू नसल्याने मुंबईच्या संघाची अवस्था आधीच दुबळी झालेली आहे. श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर, बलविंदरसिंह संधू, तुषार देशपांडे हे खेळाडू भारत ‘अ’ आणि अध्यक्षीय संघाकडून खेळत आहेत. त्यामुळे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईचा संघ रणजीच्या सलामीच्या सामन्यातच दुबळा झालेला आहे.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणेच्या ‘या’ निर्णयामुळे निवड समिती नाराज

काही दिवसांपूर्वी अजिंक्य रहाणेनेही रणजी सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. त्यापाठोपाठ आदित्य तरेनेही पहिल्या सामन्यातून माघार घेतल्यानंतर मुंबईसमोरच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. आदित्यच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार मुंबईचं नेतृत्व करणार आहे. मागच्या हंगामात मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र गुजरातकडून त्यांना अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न यंदा मुंबईचा संघ करणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blow for mumbai ranji team as skipper aaditya tare decide mot to play opening match against madhya pradeh suryakumar yadav to captain mumbai side
First published on: 13-10-2017 at 18:16 IST