राष्ट्रीय संघात पुनरागमनाचे वेध लागलेल्या वीरेंद्र सेहवागने धडाकेबाज अर्धशतकी खेळी साकारली. याचप्रमाणे रजत भाटिया (६५) आणि आशिष नेहरा (नाबाद ३८) यांनी सामना वाचविण्यासाठी झुंजार प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. एनकेपी साळवे चॅलेंजर स्पध्रेतील पहिल्याच सामन्यात इंडिया ब्ल्यू संघाने दिल्लीचा १८ धावांनी पराभव केला.
दुखापतीमुळे खेळू न शकणाऱ्या कर्णधार युवराज सिंगशिवाय उतरणाऱ्या इंडिया ब्ल्यू संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २७० धावा केल्या. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरने ७३ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. याशिवाय अक्षत रेड्डीने अर्धशतकी खेळी उभारली.
प्रत्युत्तरादाखल दिल्लीला ४७.५ षटकांमध्ये २५२ धावाच करता आल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या सेहवागने ३९ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारानिशी ५९ धावा केल्या. याचप्रमाणे अनुभवी रजत भाटियाचे अष्टपैलू प्रयत्न फोल ठरले. त्याने अर्धशतकी खेळीसह गोलंदाजीतही कमाल दाखवताना ४६ धावांत ३ बळी घेतले.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाला आता इंडिया रेड संघाला पराभूत करण्याची आवश्यकता आहे, याचप्रमाणे ब्ल्यू आणि रेड संघांमधील निकालसुद्धा अनुकूल लागल्यास दिल्लीला अंतिम सामन्यात पोहोचता येईल. युवराजने माघार घेतल्यामुळे या सामन्याला हजर राहणाऱ्या दहा हजार क्रिकेटरसिकांना सेहवाग आणि कोहलीकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. परंतु कोहली (५) यानेही निराशा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संक्षिप्त धावफलक
इंडिया ब्ल्यू : ५० षटकांत ६ बाद २७० (अक्षत रेड्डी ५३, अभिषेक नायर ९१, पियुष चावला नाबाद ४०, भुवनेश्वर कुमार नाबाद २९; रजत भाटिया ३/४६) विजयी विरुद्ध दिल्ली : ४७.५ षटकांत बाद सर्व बाद २५३ (वीरेंद्र सेहवाग ५९, रजत भाटिया ६५, आशिष नेहरा नाबाद ३८; भुवनेश्वर कुमार ३/५८, अंकित रजपूत ३/४४)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blues for delhi after abhishek nayars
First published on: 27-09-2013 at 04:31 IST