रोहन बोपण्णा आणि फ्लोरिन मर्गिआ यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, तर गिल्स म्युलरसोबत खेळणाऱ्या महेश भूपतीचे दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात आले आहे.

बोपण्णा (भारत) आणि मर्गिआ (रोमानिया) या चौथ्या मानांकित जोडीने चेक प्रजासत्ताकाच्या ल्युकास डलौही आणि जिरी व्हेसेलीचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. बोपण्णा-मर्गिआ जोडीने हा सामना ५९ मिनिटांत जिंकला. त्यांची पुढील फेरीत १४व्या मानांकित ट्रीट ह्युई आणि मॅक्स मिर्नी जोडीशी गाठ पडणार आहे.

अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित बॉब आणि माइक ब्रायन जोडीने भूपती-म्यूलर जोडीला ६-३, ६-२ असे सहज पराभूत केले. ५३ मिनिटे चाललेल्या सामन्यात भूपती-म्यूलरला आपला प्रभाव पाडता आला नाही.  दरम्यान, लिएण्डर पेस व मार्टिना हिंगिस यांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.