विम्बल्डन स्पर्धेतील शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने कारकीर्दीत दुहेरीच्या क्रमवारीतील सर्वोत्तम अर्थात पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. पुरुष दुहेरीत फ्रान्सच्या एडय़ुइर्ड रॉजर व्ॉसेलिनच्या साथीने खेळताना बोपण्णाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. अनेक वर्षांच्या परिश्रमाचे, निष्ठेचे हे फळ आहे. पहिल्यांदाच क्रमवारीतील सर्वोत्तम भारतीय ठरल्याने या यशाचे महत्त्व अनोखे असल्याचे बोपण्णाने सांगितले. बोपण्णापाठोपाठ महेश भूपती सहाव्या तर लिएण्डर पेस नवव्या स्थानी आहे. ग्रँडस्लॅम पदार्पण करणाऱ्या पुरव राजा-दिविज शरण जोडीने क्रमवारीत आगेकूच केली आहे. क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूत प्रवेश करणारा दिविज चौथा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. पुरव राजानेही कारकीर्दीतील सर्वोत्तम अर्थात ११५वे स्थान मिळवले आहे. एकेरी प्रकारात भारतातर्फे सोमदेव १३१व्या स्थानी आहे. महिलांमध्ये सानिया मिर्झाची १९व्या स्थानी घसरण झाली आहे.