बृहन्मुंबई महानगरपालिका आणि लंगडी असोसिएशनतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत यजमान मुंबईच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिला गटात मुंबई शहरसमोर मुंबई उपनगरचे आव्हान आहे, तर पुरुष गटात मुंबई आणि पुण्यामध्ये जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे.
महिला गटाच्या सामन्यात मुंबईने ठाण्याच्या संघाचा २९-९-१९-१७ असा २ गुण आणि सहा मिनिटे राखून विजय मिळवला. तन्वी उपलकरने सहा गडी, तर साक्षी पिळणकरने ८ गडी बाद केले. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत मुंबई उपनगरच्या संघाने रायगड संघाला २१-४-३ असा १ डाव आणि १४ गुणांनी विजय मिळवला. उपनगरच्या प्रतीक्षा घुगळेने पळतीचा खेळ करताना ३ गडी टिपले. अश्विनी वरगडेने संरक्षण करत ३ गडी, तर हर्षदा बामणे ४ गडी बाद केले.
पुरुष गटात मुंबईने ठाणे संघाचा २ गुण आणि ६.५० मिनिटे राखून विजय मिळवला. मध्यंतरालाच मुंबईने १० गुणांची घसघशीत आघाडी घेतली. मुंबईतर्फे प्रणय मयेकरने अष्टपैलू कामगिरी केली. विराज कोठमकर आणि पुनीत पाटील यांनी प्रणयला चांगली साथ दिली. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत पुण्याने अमरावतीवर १ डाव आणि ६ गुणांनी विजय मिळवला. अनिकेत चऱ्हाटेने ८ तर मिथिलेश जाधवने ९ गुण मिळवले.