बॉक्सिंगमधील प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेला ठोसा कधी प्राणघातकच ठरतो, याची प्रचीती प्रिटोरिया येथे आली. दक्षिण आफ्रिकेची बॉक्सर फिन्डिले मॅवेलासे हिचे बॉक्सिंगमधील दुखापतीमुळे मंगळवारी निधन झाले. आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविजेतेपद मिळविणारा धावपटू म्बॅलुनी मुलौझी व दक्षिण आफ्रिकेच्या फुटबॉल संघाचा कर्णधार व गोलरक्षक सेन्झो मेयिवा यांच्या आकस्मिक मृत्यूच्या धक्क्यातून आफ्रिकेचे क्रीडा क्षेत्र सावरत नाही, तोच मॅवेलासे हिच्या निधनामुळे त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. मॅवेलासे हिला १० ऑक्टोबर रोजी येथील एका निमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेच्या वेळी एका खेळाडूने मारलेला ठोसा तिच्या कानशिलावर बसला व ती जागच्या जागी कोसळली. अधिकाऱ्यांनी तिला त्वरित रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर गेले अठरा दिवस उपचार सुरू होते. मंगळवारी तिचे निधन झाले, असे राष्ट्रीय क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले.