ज्ञानेश भुरे

पुणे : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला वगळणे म्हणजे खेळाडूंकडून संधी हिसकावण्याचाच प्रकार झाला. सर्वात जुना आणि पहिल्या ऑलिम्पिकपासून खेळल्या जाणाऱ्या कुस्तीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय खेदजनक आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि २०२६च्या स्पर्धेच्या संयोजन समितीच्या निर्णयाचा भारतीय कुस्तीगीर महासंघ (डब्ल्यूएफआय) निषेध करते. आम्ही राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची मागणी करू, अशी भूमिका ‘डब्ल्यूएफआय’चे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी घेतली आहे.

‘‘यजमान देशाला क्रीडा प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे. मात्र, ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असणाऱ्या खेळांना त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळता कामा नये. केवळ भारतच नाही, तर नायजेरियासारख्या अनेक छोटय़ा देशांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीमध्ये पदके मिळविली आहेत. त्यांच्यावरही हा अन्याय आहे,’’ असे तोमर म्हणाले. याबाबत ‘डब्ल्यूएफआय’ ‘आयओए’शी चर्चा करणार असून, आम्हाला या स्पर्धेवर बहिष्कार टाकावा असे वाटते, असेही तोमर यांनी सांगितले.

लांडगे यांची विनंती फेटाळली!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्तित्वाबाबत राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने बाळासाहेब लांडगे गटाला केली होती. त्यानुसार लांडगे गटाने ‘डब्ल्यूएफआय’कडे राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याबाबत फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र, या गटाची याचिका फेटाळण्यात आल्याचे तोमर यांनी सांगितले. कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यानंतर नियुक्त हंगामी समितीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली असून, येत्या दोन दिवसांत त्या निवडणुकीचा निर्णय जाहीर केला जाईल, असेही तोमर यांनी सांगितले.