काही दिवसांपूर्वीच भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली. न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव केला. विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे मातब्बर फलंदाज अपयशी ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये अनुभवी आणि भरवशाच्या पुजाराकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याला चांगले योगदान देता आले नाही. खराब प्रदर्शनानंतर पुजाराला संघातून वगळण्याची मागणीही करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने पुजाराचा बदली खेळाडू सुचवला आहे.

हॉगने एका चाहत्याला उत्तर देताना म्हटले, ”जर पुजाराची जागा कोणाला घेता येईल, तर ती पृथ्वी शॉ आहे. माझ्या मते, त्याच्यासाठी तिसऱ्या क्रमांकाची जागा सलामीपेक्षा अधिक योग्य आहे. त्याच्याकडे खूप कौशल्य आहे. यावेळी तो इंग्लंड दौर्‍यासाठी संघात नाही, परंतु तो वाइल्ड कार्डच्या माध्यमातून प्रवेश करू शकतो.”

हेही वाचा – सचिन तेंडुलकरचा मुलगा महेंद्रसिंह धोनीला हवीय शिक्षकाची नोकरी!

ब्रॅड हॉगच्या या ट्वीटवर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने प्रतिक्रिया व्यक्त केली. हॉगच्या मताशी सलमान बट सहमत नाही. बट म्हणाला, ”चेतेश्वर पुजारा आणि पृथ्वी शॉची स्टाईल अगदी वेगळी आहे. एक स्ट्रोक खेळाडू आहे, तर दुसरा चांगला बचाव करतो, विशेषत: नवीन चेंडूच्या विरूद्ध. पृथ्वी शॉचे तंत्र असे आहे, की तो त्याचे शॉट्स मोकळेपणे खेळतो आणि सर्व प्रकारचे शॉट्स खेळतो. जेव्हा आपण कसोटी क्रिकेटमध्ये खूप लवकर शॉट्स खेळण्यास प्रारंभ करता, तेव्हा आपल्याला अडचण येते. पृथ्वी शॉने आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले असेल, परंतु भारताकडे बचावात्मक खेळाडू अधिक असतील जे कसोटी खेळतील.”