भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या कुस्तीपटूंनी प्रदीर्घ काळ आंदोलन केल्यानंतर त्यावर सरकारने चौकशी समिती गठित केली आहे. या समितीसमोर गेल्या महिन्यात ६ जून रोजी ब्रिजभूषण सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी सहापैकी एका महिला कुस्तीपटूनं केलेल्या आरोपांबाबत ब्रिजभूषण सिंह यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी त्यांच्या बाजूने त्या दिवशी काय घडलं, याबाबत भूमिका मांडली. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
काय होता आरोप?
आंदोलक महिला कुस्तीपटूंपैकी एका महिला कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांच्यावर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. “ब्रिजभूषण सिंह यांनी श्वासोच्छवासाबाबत सांगताना माझ्या पोटाला आणि स्तनांना तीन ते चार वेळा हात लावला आणि माझ्या श्वासोच्छवासावर बोलत राहिले”, असं या महिला कुस्तीपटूने तपास समितीला जबाबात सांगितलं होतं.
ब्रिजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, या आरोपांसंदर्भात ब्रिजभूषण सिंह यांना समितीकडून जबाबावेळी विचारणा केली असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. “नेमकं हे कुठे झालं हेच मला आठवत नाहीये. पण एका स्पर्धेदरम्यान मी आणि संबंधित महिला कुस्तीपटू आणि प्रशिक्षक आम्ही त्या कुस्तीपटूच्या खेळाबद्दल चर्चा करत होतो. मग आम्हाला लक्षात आलं की तिच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमध्ये अडचण आहे”, असं ब्रिजभूषण सिंह म्हणाले.
“त्या महिला कुस्तीपटूनं आणि तिच्या प्रशिक्षकांनी मला त्याबद्दल विचारणा केली. तेव्हा मी माझा हात माझ्या पोटावर ठेवला आणि त्यांना दाखवलं की जेव्हा आपण श्वास आत घेतो, तेव्हा पोट फुगायला हवं तर जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता, तेव्हा पोट आत जायला हवं. तेव्हा सगळ्यांनी त्यांच्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रीत केलं. जेव्हा संबंधित तक्रारदार कुस्तीपटू माझ्याकडे आली, तेव्हा मी तिला योगाचा सराव करायचा सल्ला दिला”, असं ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितलं.
“मी तर संघाच्या फिजिओथेरपिस्टलाही विचारलं की ती त्या कुस्तीपटूच्या हातांना दिवसातून दोन ते तीन वेळा मसाज करते की नाही. तिने नाही सांगितल्यावर मी तिला कुस्तीपटू झोपल्यावर त्यांच्या श्वासोच्छवास प्रक्रियेचं निरीक्षण करायलाही सांगितलं. पण ती तेव्हा फक्त हसली. त्यामुळे तेव्हा मी म्हणालो की ती या सगळ्याबाबत गंभीर नाही, त्यामुळे तिला पदक जिंकता येणं कठीण आहे”, असंही ब्रिजभूषण यांनी आपल्या जबाबात सांगितलं.
दरम्यान, या समितीनं सादर केलेल्या अहवालाचा समावेश दिल्ली पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये केला आहे.