डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार आहे. ब्रॉडच्या अनुपस्थितीमध्ये ईऑन मॉर्गनकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
इंग्लिश लायन्स संघासोबत भारत दौऱ्यावर आलेला जेम्स हॅरिस सध्या पुण्यात आहे. तो ब्रॉडऐवजी इंग्लंड संघात स्थान मिळवेल. २२ वर्षीय हॅरिस अद्याप एकही ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. विश्रांती आणि पुनर्वसन कार्यक्रमासाठी ब्रॉड त्वरित मायदेशात परतणार आहे. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनसुद्धा इंग्लंडला जाणार आहे. परंतु जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी मात्र फिन उपलब्ध होऊ शकेल.