संयोजनपदाचे हक्क देताना भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळे २०१८ आणि २०२२मध्ये अनुक्रमे रशिया आणि कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषकावर युरोपियन संघ बहिष्कार घालतील, असा इशारा जर्मन लीगमधील एका बडय़ा पदाधिकाऱ्याने दिला आहे.
बुंडेसलीगा स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तियन सेयफर्ट म्हणाले की, ‘‘आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाला (फिफा) प्रत्युत्तर देण्यासाठी युरोपियन देशांनी एकत्र येऊन या स्पर्धावर बहिष्कार घालणेच उचित ठरणार आहे. जर्मन संघाचा प्रमुख या नात्याने फिफाचे प्रतिनिधित्व करण्याची आमची इच्छा नाही. विश्वचषकात खेळणारे जवळपास ७५ टक्के खेळाडू हे युरोपियन क्लबशी करारबद्ध आहेत. जर या क्लबने फिफा विश्वचषकात खेळायचे नाही, असे ठरवले तरच परिस्थिती बदलू शकेल. फिफा भलेही जर्मनी, इंग्लंड, इटली आणि स्पेन या संघांवर पुढील तीन विश्वचषकांसाठी बंदी घालेल, पण त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण हे अव्वल देश विश्वचषकात सहभागी झाले नाहीत, तर स्पर्धेला अर्थच शिल्लक राहणार नाही.’’
‘‘युरोपियन देश एकत्र आले तरच बहिष्कार घालण्याचा फायदा होईल. दुर्दैवाने, अनेक देश तत्त्वानुसार वागत नाहीत. फुटबॉलमधील गंभीर संघ या नात्याने, अशा प्रकारच्या गैरव्यवहारानंतर फिफा विश्वचषकात  सहभागी व्हायची आमची इच्छा नाही,’’ असेही त्यांनी सांगितले.
युरोप आणि अमेरिकेतील काही नेत्यांनी रशिया आणि कतारमधील फिफा विश्वचषकावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे, या वृत्ताचे फिफाने मात्र खंडन केले आहे. कतारला संयोजनपदाचे हक्क देताना भ्रष्टाचार झाल्याच्या वृत्ताचाही फिफाने इन्कार केला आहे.