परदेशातील चौथ्या-पाचव्या दर्जाच्या खेळाडूंना भरपूर आर्थिक मोबदल्याची हमी देत निमंत्रित करायचे आणि त्यांना भारतामधील रस्त्यांवर पळायला लावायचे हा ‘मॅरेथॉन’ या गोंडस नावाखाली आजकाल k05व्यवसायच झाला आहे. या शर्यतीच्या निमित्ताने प्रायोजकांकडून भरपूर कमाई करून घ्यायची व त्यामध्ये स्वत:ची राजकीय किंवा संघटनात्मक पोळी भाजवून घ्यायची ही वृत्ती बोकाळली आहे. जर खरोखरीच अ‍ॅथलेटिक्सविषयी एवढे प्रेम असते तर स्वातंत्र्यानंतर भारताला ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये किमान एक तरी पदक मिळाले असते.
मॅरेथॉन शर्यतीचा इतिहास पाहिला तर खरोखरच किती चैतन्य त्यातून मिळायला पाहिजे. ऑलिम्पिक स्पर्धाचा उगम झाला त्या ग्रीस देशातच या अनोख्या शर्यतीचा जन्म झाला. त्याची जन्मकहाणीदेखील रोमांचकारी आहे. पर्शियन सैन्याने ग्रीसमधील अ‍ॅथेन्सवर आकस्मिक हल्ला चढविला. मिल्टी आड्स या सेनापतीच्या नेतृत्वाखाली ग्रीसच्या अगदी मोजक्या सैनिकांनी मॅरेथॉन गावाच्या पठारावर पर्शियन सैन्याशी दोन हात केले. त्यांनी घनघोर लढाई करत पर्शियन सैन्यदलाच्या २० हजार सैनिकांना कंठस्थान घातले. ग्रीक नागरिकांना या लढाईतील विजयाची बातमी देण्यासाठी फिलिपिड्स या सैनिकाने मॅरेथॉनहून थेट अ‍ॅथेन्सकडे धाव घेतली. दऱ्याखोऱ्या व डोंगर या कशाचेही भान न ठेवता तो तब्बल २६ मैल ३८५ यार्ड्स धावत अ‍ॅथेन्स शहरात पोहोचला. तेथील राजाला त्याने आपण लढाई जिंकली एवढेच शब्द सांगितले आणि जागच्या जागी कोसळला तो पुन्हा न उठण्यासाठीच. या सैनिकाचे स्मरण कायमस्वरूपी राहावे म्हणून ग्रीक ऑलिम्पिक संघटकांनी मॅरेथॉन शर्यतीचा समावेश ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये केला.
भारतात ऑलिम्पिक चळवळीची सुरुवात करण्यासाठी १९१८मध्ये पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे क्रीडा संघटकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर १९१९मध्ये मॅरेथॉन शर्यतही आयोजित करण्यात आली. हीच भारतामधील पहिली मॅरेथॉन शर्यत होती. पुण्यातील पहिली मॅरेथॉन शर्यत १९८३मध्ये सुरू झाली. तेव्हापासूनच या शर्यतीचे नियमितपणे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत २८ वेळा या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून आजपर्यंत जवळ जवळ ५० लाख धावपटूंनी त्यामध्ये भाग घेतला आहे.
अ‍ॅथलेटिक्सविषयी जनजागृती निर्माण व्हावी व मैदानी स्पर्धाचा प्रसार खेडोपाडी व्हावा याच हेतूने केवळ पुण्यात नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉन शर्यतींचे आयोजन केले जात आहे. पुणे, मुंबई, वसई, ठाणे, दिल्ली, लखनौ, बंगळुरू, कोलकाता आदी मॅरेथॉन शर्यतींना प्रसिद्धीचा झगमगाट लाभला आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडूंपेक्षाही केनिया, इथिओपिया, युगांडा, जपान आदी देशांच्याच धावपटूंचे वर्चस्व असते. देशात दरवर्षी २० ते २५ मॅरेथॉन शर्यती होतात.
भारताच्या पी. टी. उषा हिने १९८४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकापर्यंत झेप घेतली होती. या स्पर्धेतील ४०० मीटर अडथळा शर्यतीमध्ये तिचे कांस्यपदक एक शतांश सेकंदांनी हुकले. त्यानंतर एवढी उल्लेखनीय कामगिरी करण्यात भारतीय धावपटूंना सपशेल अपयश आले आहे. उषा हिला कारकीर्द घडविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्या तुलनेत हल्लीच्या धावपटूंना परदेशी प्रशिक्षण, परदेशातील स्पर्धामधील सहभाग आदी कशाचीही कमतरता नाही. मॅरेथॉन शर्यतींद्वारे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, अव्वल कामगिरीची प्रेरणा मिळावी याच अपेक्षेने अशा शर्यती घेतल्या जातात. दुर्दैवाने केनिया, इथिओपिया यांच्या तुलनेत आपल्या देशाच्या धावपटूंची ऑलिम्पिकमधील कामगिरी अगदीच कमकुवत असते. आपले धावपटू ऑलिम्पिक ‘ब’ श्रेणी पात्रता निकष पूर्ण करीत ऑलिम्पिकवारी करून घेतात. तेथे त्यांना पहिल्या पंचवीस खेळाडूंमध्येही स्थान मिळविता येत नाही.
महाराष्ट्रात दरवर्षी तीन-चार आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यती घेतल्या जातात. त्याद्वारे मिळालेला निधी प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी कितपत उपयोगात येतो हे संघटकच जाणो. महाराष्ट्रात चांगल्या सुविधा व आर्थिक कमाई मिळत नाही या कारणास्तव महाराष्ट्राचे अनेक गुणवान खेळाडू अन्य राज्यांचा रस्ता धरतात. या खेळाडूंच्या चांगल्या अर्थार्जनाची हमी केवळ शासनाची आहे, असे सांगून राज्यातील संघटक आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकतात व मोकळे होतात. जर मॅरेथॉन शर्यतींकरिता मोठय़ा उद्योजकांकडून प्रायोजकत्व मिळू शकते तर एखाद्या गरजू व गुणवान धावपटूकरिता या संघटकांनी शब्द टाकायला हरकत नाही.
मॅरेथॉनविषयी लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सिनेकलावंतांना भरपूर आर्थिक मोबदला देऊन आणले जाते, तसेच बक्षीस समारंभाच्या वेळी लावणी व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांवर लाखो रुपये उधळले जातात. त्या ऐवजी जर गरजू धावपटूंकरिता निधी दिला तर त्या पैशांचा खरोखरीच योग्य विनियोग होऊ शकेल.
मॅरेथॉन शर्यतींद्वारे राजकीय नेते आपल्या मतदारसंघांतून मिरवण्याची हौस भागवून घेतात. धावपटूंपेक्षाही या नेत्यांनाच अधिक महत्त्व दिले जाते. स्वर्गीय राजीव गांधी हे पंतप्रधान असताना ते मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे यासाठी पुणे मॅरेथॉन शर्यत ऐन वेळी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. हे लक्षात घेता संयोजकांचे खेळाडूंबाबतचे प्रेम किती दिखावू हे स्पष्ट होते.
मॅरेथॉन शर्यतीमुळे निर्माण होणारा वाहतुकीचा खोळंबा, शर्यतीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरून ठेवण्याची संयोजकांची वृत्ती यामुळे लोकांमध्ये या शर्यतीविषयी नकारात्मक वृत्तीच अधिक जोपासली जाऊ लागली आहे. फारसे स्वारस्य नसलेली ही शर्यत कायमस्वरूपी बंद करावी अशीच मागणी डोके वर काढू लागली आहे. त्यामुळे संयोजकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.