‘‘भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट मिळेल का?,’’ हा सवाल ईडन गार्डन्सकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बंगालचे क्रिकेटप्रेमी एकमेकांना विचारत होते. याचप्रमाणे काळाबाजारवाल्यांना ही सुवर्णसंधी चालून आल्याने  ‘‘तिकीट चाहिए क्या?’’ , अशी विचारणा करीत हे व्यवहार सुरू होते. गेल्या वर्षी भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्याला याच क्रिकेटरसिकांनी सपशेल पाठ फिरवली होती. पण गुरुवारी होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता कोलकातानगरीत शिगेला पोहोचली आहे. मात्र क्रिकेट असोसिएशन ऑफ कोलकाता(कॅब)ने ६६ हजार प्रेक्षकक्षमतेच्या ईडन गार्डन्सची फक्त ३५०० तिकीटे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवून क्रिकेटरसिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
‘कॅब’ने संघटनेचे सदस्य आणि मान्यता असलेल्या १२१ क्लबस्साठी भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे राखून ठेवत हा सामना हाऊस फुल्ल होण्याचे संकेत दिले आहेत. गतवर्षीच्या भारत-इंग्लंड सामन्याची २० हजार तिकीटे कॅबने प्रेक्षकांसाठी विक्रीला ठेवली होती. परंतु त्या सामन्याला प्रत्यक्षात २२ हजार क्रिकेटरसिकांनीच हजेरी लावल्यामुळे रिकामे स्टँड्स अधिक प्रमाणात पाहायला मिळाले होते. पण सध्या कॅबने उचलेल्या पावलामुळे क्रिकेटरसिक तर नाराज आहेच, याशिवाय काळाबाजारवाल्यांचे चांगलेच फावले आहे.
२००४मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्याला ९० हजार क्रिकेटरसिकांनी उत्साही गर्दी केली हेाती. पण २०११च्या विश्वचषकासाठी या स्टेडियमचे नूतनीकरण झाल्यामुळे प्रेक्षकक्षमता ६६ हजापर्यंत कमी झाली. क्लबस् आणि सदस्यांसाठी राखून ठेवण्यात आलेली सर्व तिकीटे संपलेली आहेत, अशी माहिती कॅबचे खजिनदार बिस्वरूप देय यांनी दिली. पण कॅबच्या कृत्याची आणि ऑनलाइन तिकीट विक्रीची माहिती नसलेल्या सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींनी ईडन गार्डन्सकडे तिकिटासाठी उत्साही गर्दी केली होती.
भारत-पाकिस्तान सामन्यानिमित्त ईडन गार्डन्सला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षारक्षकांनी स्टेडियमच्या चहूबाजूला कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे तिकिटासाठी आणि क्रिकेटपटू पाहण्यासाठी स्टेडियमपाशी गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांना हटविण्याची जबाबदारीही पोलिसांना पार पाडावी लागली.