वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट संघासाठी मोहम्मद सिराज आता जसप्रीत बुमराइतकाच महत्त्वाचा झाला असून त्याच्याही कार्यभार व्यवस्थापनाबाबत विचार झाला पाहिजे, असे मत माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह याने मांडले.

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३१ वर्षीय सिराजने पाचही कसोटी सामने खेळताना तब्बल १८५.३ षटके टाकली. यात त्याने २३ बळी मिळवत मालिकेतील सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरण्याचा मानही मिळवला. सिराजने निर्णायक पाचव्या कसोटीत एकूण नऊ बळी मिळवत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिकाही बजावली. ‘‘सिराजला दुखापतमुक्त ठेवायचे झाल्यास कार्यभार व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी कालावधीत बरेच सामने खेळल्यास वेगवान गोलंदाजांना दुखापतींचा धोका असतो. त्यामुळे बुमराप्रमाणेच सिराजबाबतही खबरदारी बाळगणे गरजेचे आहे,’’ असे आरपी याने सांगितले.

‘‘बुमराने गेल्या दोन वर्षांत झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. योग्य कार्यभार व्यवस्थापनामुळेच हे शक्य झाले. आता सिराजही बुमराइतकाच महत्त्वाचा गोलंदाज झाला आहे. त्यामुळे त्यालाही अधूनमधून विश्रांती देणे आवश्यक आहे. त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे,’’ असेही आरपी म्हणाला.

फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीतही भागीदारी महत्त्वाची असते. बुमराची गोलंदाजीची शैली (ॲक्शन) वेगळी असल्याने फलंदाज त्याच्याविरुद्ध अडचणीत सापडतात. तो अधिक बळी मिळवतो. दुसऱ्या बाजूने अचूक टप्पा राखून फलंदाजावर दडपण वाढविणे हे सिराजचे काम असते. तो आपली भूमिका चोख बजावतो. त्यामुळेच या दोघांना यशस्वी कामगिरी करता येते. – आरपी सिंह, माजी कसोटीपटू.