पीयूष चावलाच्या नेतृत्वाखालील मध्य विभाग आणि आर. विनय कुमार कर्णधार असलेला दक्षिण विभाग यांच्यात बुधवारपासून सुरू होणारा दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेचा अंतिम सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
लाहली येथे झालेल्या उपांत्य फेरीत दक्षिण विभागाने पूर्व विभागाचा एक डाव आणि ११८ धावांनी पराभव केला, तर मोहालीत फलंदाजांच्या नंदनवनात मध्य विभागाने बलाढय़ उत्तर विभागाला नामोहरम केले. दक्षिणेचा रॉबिन उथप्पा आणि मध्यचा नमन ओझा यांची फलंदाजी यावेळी सर्वाचे लक्ष वेधेल.
मध्य विभागाला लेग-स्पिनर करण शर्मा आणि चायनामन कुलदीप यादव यांची उणीव भासेल. याचप्रमाणे दक्षिण विभागाच्या संघात स्टुअर्ट बिन्नी, करुण नायर, मनीष पांडे आणि संजू सॅमसन या चार खेळाडूंचा अभाव आहे. सॅमसन मागील सामन्यातसुद्धा अंतिम ११ जणांमध्ये नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यता आला आहे. मध्य विभागात अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज अली मुर्तझा आणि विदर्भाचा ऑफ-स्पिनर अक्षय वाखरे यांचा समावेश करण्यात आला आहे, तर दक्षिणेच्या संघात तामिळनाडूचा मधल्या फळीतील फलंदाज रामास्वामी प्रसन्ना, ऑफ-ब्रेक गोलंदाज मलोलन रंगराजन, केरळचा भारतीय ‘अ’ संघाचा माजी फलंदाज वासुदेवन जगदीश आणि हैदराबादचा मध्यमगती गोलंदाज रवी किरण यांचा समावेश करण्यात आला आहे. स्थानिक क्रिकेटमधील फॉर्मात असलेले फलंदाज दक्षिणेकडे आहेत. रॉबिन उथप्पाने लाहली येथेसुद्धा शतक झळकावले होते. लोकेश राहुलसुद्धा निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
संघ
दक्षिण विभाग : आर. विनय कुमार (कर्णधार), रॉबिन उथप्पा, लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), बाबा अपराजित, अभिमन्य मिथुन, प्रग्यान ओझा, एच. एस. शरथ, हनुमा विहारी, श्रेयस गोपाळ, मलोलन रंगराजन, वासुदेवन जगदीश, रामास्वामी प्रसन्ना, रवी किरण.
मध्य विभाग : पीयूष चावला (कर्णधार), फैझ फझल, जलाल सक्सेना, रॉबिन बिश्त, नमन ओझा (यष्टीरक्षक), अशोक मनेरिया, महेश रावत (यष्टीरक्षक), अली मुर्तझा, अक्षय वाखरे, ईश्वर पांडे, पंकज सिंग, अरिंदम घोष, अमित मिश्रा, शलभ श्रीवास्तव.