भारताचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अखेरच्या फेरीत व्हॅसिल इव्हानचुककडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पाच वेळा जगज्जेत्या आनंदचे स्पर्धेतील आव्हान आठव्या पराभवासह संपुष्टात आले.

५० वर्षीय आनंदची १० खेळाडूंच्या या स्पर्धेत सात गुणांसह नवव्या स्थानी घसरण झाली. आनंद आणि इव्हानचुक यांच्यातील चारही डाव बरोबरीत सुटले. त्यामुळे टायब्रेकरमध्ये काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना इव्हानचुकने बाजी मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनने २५ गुणांसह अग्रस्थान पटकावले. इयान नेपोमनियाची २० गुणांसह दुसऱ्या तर अनिश गिरी १८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. पीटर स्विडलरने १४ गुणांसह चौथे स्थान प्राप्त केले.