आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत आणि बांगलादेशमध्ये रंगणार आहे. बांगलादेशचा संघ पहिल्यांदाच आयसीसीकडून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे. त्यामुळे बांगलादेशमधील क्रिकेट रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या उत्साहाने पुन्हा एकदा मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळते आहे.

बांगलादेशी चाहत्यांनी त्यांची खुन्नस बाहेर काढत पुन्हा एकदा भारताचा आणि भारतीय संघाचा अपमान केला आहे. बांगलादेशी क्रिकेट चाहत्यांनी एक वाघ कुत्र्याची शिकार करताना दाखवला आहे. या चित्रातील वाघावर बांगलादेशचा झेंडा दाखवण्यात आला आहे, तर कुत्र्याच्या पाठीवर भारताचा झेंडा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे बांगलादेशवर क्रिकेट विश्वातून मोठी टीका होत आहे.

भारत आणि बांगलादेशचे खेळाडू अनेकदा मैदानात एकमेकांना भिडले आहेत. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेशचे संघ उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने १०९ धावांनी बांगलादेशचा धुव्वा उडवला होता. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने १३७ धावांची शानदार खेळी केली होती. रोहितच्या दमदार खेळीमुळे भारताने बांगलादेशसमोर ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला फक्त १९७ धावाच करता आल्या.

विश्वचषक स्पर्धा २०१५ मध्ये भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्यातील पंचांचे निर्णय सदोष असल्याचा आरोप बांगलादेशकडून करण्यात आला होता. रोहित शर्मा ९१ धावांवर असताना कमरेच्यावर टाकण्यात आलेल्या फुल टॉस चेंडूवर झेलबाद झाला होता. मात्र चेंडू शरीरवेधी असल्याने पंचांनी नोबॉल दिला आणि रोहित शर्मा नाबाद ठरला. तेव्हापासून भारत आणि बांगलादेश सामन्याआधी बांगलादेशचे चाहते छायाचित्रांच्या माध्यमातून भारतीय संघावर पातळी सोडून टीका करतात.

भारताविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यावर बांगलादेशमधील एका वर्तमानपत्राने वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केले होते. यामध्ये मुस्तफिझुर रेहमानच्या हातात वस्तरा दाखवण्यात आला होता आणि भारतीय खेळाडूंच्या डोक्यावरील अर्धे केस कापलेले दाखवण्यात आले होते. आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने असताना बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदच्या हाती महेंद्रसिंग धोनीचे शीर असल्याचे फोटोशॉप केलेले छायाचित्र बांगलादेशी चाहत्यांकडून तयार करण्यात आले होते.