बीसीसीआयच्या स्थानिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी प्रशिक्षक अशी ओळख असलेल्या चंद्रकांत पंडीत यांनी अखेरीस विदर्भाच्या संघाला रामराम केला आहे. आपल्या ३ वर्षांच्या कार्यकाळात पंडीत यांनी विदर्भाच्या संघाला सलग दोनवेळा रणजी करंडक जिंकवून दिला. याव्यतिरीक्त पंडितांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाने इराणी करंडकावरही आपलं नाव कोरलं होतं. नवीन वर्षासाठी चंद्रकांत पंडीत मध्य प्रदेशच्या संघाला मार्गदर्शन करणार आहेत. याआधी पंडीत यांनी मध्य प्रदेश संघाचं रणजी करंडकात प्रतिनिधीत्व केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. एका जागेवर मी ३ वर्षांपेक्षा जास्त काळ थांबत नाही…माझा मित्र किरण मोरेला हे माहिती होतं. यापुढे मी विदर्भाच्या संघाला मार्गदर्शन करणार नाही हे जगजाहीर होतं. यानंतर त्याने मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेत माझ्या नावाची शिफारस केली, आणि त्यांनी पुढील दोन वर्षांसाठी प्रशिक्षकपदासाठी विचारलं. मी ही नवीन जबाबदारी स्विकारली आहे.” पंडीत यांनी इंडियन एक्स्क्पेस वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली.

विदर्भ आणि मध्य प्रदेश या दोन्ही संघांमध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य असल्याचं पंडीत यांनी सांगितलं. “ज्यावेळी मी विदर्भाची जबाबदारी स्विकारली त्यावेळी हा संघ स्थानिक क्रिकेटमध्ये आपलं नाव मोठं करण्यासाठी धडपडत होता. लागोपाठ दोन विजेतेपदांमुळे चित्रच बदललं आहे. मध्य प्रदेशमध्येही काही चांगले तरुण खेळाडू आहेत. मला तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायला अधिक आवडतं. त्यामुळे या मुलांसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे”, पंडीत आपल्या नव्या जबाबदारीबद्दल बोलत होते. सध्या करोना विषाणूमुळे पंडीत आपल्या गावाला रत्नागिरीत आहेत. त्यामुळे आगामी कालखंडात पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant pandit bids bye to vidarbha next stop madhya pradesh psd
First published on: 26-03-2020 at 15:24 IST