तिरुवनंतपूरम : परिस्थिती आणि वातावरणानुसार खेळात बदल करून संघाच्या यशात योगदान देण्याचा भारतीय संघातील सर्व खेळाडूंचा प्रयत्न असल्याचे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग म्हणाला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला आता तीन आठवडय़ांहूनही कमी कालावधी शिल्लक आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतातील वातावरण व खेळपट्टय़ांमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात यशस्वी ठरण्यासाठी भारताच्या सर्व गोलंदाजांना आपल्या खेळात योग्य ते बदल करावे लागतील. ‘‘परिस्थितीनुसार खेळात बदल करण्यासाठी आमचे सर्व खेळाडू प्रयत्नशील आहेत. सामन्याची स्थिती आणि संघाला आमच्याकडून असलेल्या अपेक्षा यांना अनुसरून खेळात विविधता आणणे हे आमचे विश्वचषकापूर्वीचे मुख्य ध्येय आहे. ऑस्ट्रेलियात गेल्यानंतरच आम्हाला तेथील वातावरणाचा अंदाज येईल. तेथे खेळण्यासाठी आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे अर्शदीपने सांगितले.

अर्शदीपला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  त्याने पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात ३२ धावांत तीन बळी घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्याने वैयक्तिक पहिल्या षटकात स्विंगचा अप्रतिम वापर करत क्विंटन डीकॉक, रायली रूसो आणि डेव्हिड मिलर या आफ्रिकेच्या प्रमुख तीन फलंदाजांना माघारी धाडले.

‘‘आम्ही सरावादरम्यान विविध गोष्टी करून पाहात होतो. त्यानंतर प्रत्यक्ष सामन्यात योजनेनुसार गोलंदाजी करण्याचा आमचा प्रयत्न होता. या सामन्यात पॉवर-प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करण्यात आम्हाला यश मिळाले. सुरुवातीच्या षटकांत चेंडू स्विंग होत होता. त्यामुळे केवळ योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचे माझे लक्ष्य होते. त्यात मी यशस्वी ठरलो. आता आगामी सामन्यांतही अशीच कामगिरी सुरू राखण्याचा मानस आहे,’’ असे अर्शदीप म्हणाला. तसेच दुसऱ्या बाजूने दीपक चहरनेही प्रभावी मारा केल्यामुळे आफ्रिकन फलंदाजांवर दडपण टाकणे सोपे गेले, असेही अर्शदीपने नमूद केले.