काही दिवसांपूर्वी आलेला पूर, श्रीलंकेच्या संघाला असलेला विरोध आणि तीन ‘स्टँड’चे अपूर्ण बांधकाम यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सामने चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवायचे की नाही, याबाबत शंका आहे. पण अजूनही विश्वचचषकासाठी चेन्नईचे केंद्र वगळण्यात आलेले नाही, त्याबाबतचा निर्णय अजूनही विचाराधीन आहे, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
‘‘आम्ही याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. २५ ऑगस्टपर्यंत आम्ही भारतातील काही केंद्रांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते, पण त्यांनी अजूनही ते सादर केले नाहीत. चेन्नई केंद्राबाबत काही समस्या असल्या तरी त्याबाबतचा निर्णय विचाराधीन आहे,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.
पुढील वर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत बीसीसीआयची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर ठाकूर यांनी पत्रकारांना याबाबत काही माहिती दिली.
‘‘अजूनपर्यंत चेन्नईच्या केंद्राबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. या मैदानात खेळण्यात काही समस्या आहेत. स्थानिकांच्या विरोधामुळे तिथे श्रीलंकेचे सामने खेळवू शकत नाही. त्याचबरोबर तीन स्टँडचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्या स्टँडपासून तुम्ही भारतीय चाहत्यांना दूर ठेवू
शकत नाही,’’ असे ठाकूर
म्हणाले.
जर चेन्नईला सामने होऊ शकले नाही, तर त्यासाठी काही पर्यायी केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे का, असे विचारल्यावर ठाकूर म्हणाले की, ‘‘माझ्या मते अशी परिस्थिती ओढवणार नाही. एका केंद्राला सामने देताना त्याचा पूर्णपणे विचार करावा लागतो. त्या केंद्रावर कोणते सामने खेळवता येऊ शकतात आणि कोणते नाही, याचा विचार करावा लागतो. विश्वचषकाचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठीच आम्ही या बैठकीचे आयोजन केले होते.’’
केंद्राला मान्यता देण्याच्या प्रक्रियेबद्दल ठाकूर म्हणाले की, ‘‘आता केंद्राला मान्यता देण्यासाठी नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही केंद्राबाबतची सर्व माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पाठवणार आहोत. त्यानंतर मान्यता द्यायची की नाही, याचा निर्णय आयसीसी घेणार असून त्यानंतर विश्वचषकाचे वेळापत्रक प्रकाशित करण्यात येईल.’’