एटीपी दर्जाच्या स्पर्धेत एकेरी प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच करण्याची किमया युकी भांबरीने गुरुवारी साधली. असे करणारा तो केवळ तिसरा भारतीय ठरला आहे. परंतु ही आगेकूच करायला कारणीभूत ठरली ती युकीचा प्रतिस्पर्धी इटलीचा फॅबिओ फॉगनिनी. डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे फॅबिओने सामना अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि युकीला विजयी घोषित करण्यात आले. प्राथमिक फेऱ्यांचा अडथळा पार करून दाखल झालेल्या युकीसमोर जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या फॅबिओचे आव्हान होते. मातब्बर प्रतिस्पर्धीसमोर शानदार खेळ करताना युकीने पहिला सेट ६-१ असा नावावर केला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये जमिनीलगतच्या जोरदार फटक्यांच्या जोरावर फॅबिओने युकीला नामोहरम केले. मुकाबला ५-५ असा बरोबरीत असताना फॅबिओने माघार घेण्याचा निर्णय घेतला. पुढच्या फेरीत युकीसमोर कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असलेल्या वासेक पॉसपिसिलचे आव्हान असणार आहे.
२१ वर्षीय आणि जागतिक क्रमवारीत १९५व्या स्थानी असलेला युकी एटीपी दर्जाच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारा सोमदेव देववर्मन आणि लिएण्डर पेस यांच्यानंतरचा केवळ तिसरा खेळाडू आहे.
चेन्नईचा स्थानिक १९ वर्षीय रामकुमारचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानी असलेला मार्केल ग्रॅनोलर्सने रामकुमारला ६-२, ६-४ असे नमवले.