एफसी गोवा संघावर ३-२ मात; मेन्डोझाचा निर्णायक गोल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या आयएसएलमध्ये  १८६ गोल्सचा पाऊस पडला. गतवर्षीच्या तुलनेत (१२८) ५८ गोल्स अधिक झाले.

अंतिम लढतीत शेवटच्या क्षणी प्रतिस्पध्र्यावर पलटवार करत विजयश्री खेचून आणण्याची सहमालक आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची शैली अंगीकारत चेन्नईयन एफसी संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत चेन्नईयन एफसी संघाने एफसी गोवा संघावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. शेवटच्या चार मिनिटांमध्ये तीन गोलसह झालेल्या नाटय़मय मुकाबल्यात चेन्नई संघाने सरशी साधली.

घरच्या मैदानावर जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने गोव्याचा संघ मैदानात उतरला होता. माजी दिग्गज खेळाडू झिको यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोव्याने साखळी लढतींमध्ये आक्रमक खेळावर भर दिला होता. अंतिम लढतीत त्यांनी बचावावर भर देत चेन्नईला पहिल्या सत्रात गोल करु दिला नाही. ५४व्या मिनिटाला ब्रुनो पेलिस्सारीने चेन्नईचे खाते उघडले. चेन्नईच्या समर्थकांचा जल्लोष सुरु असतानाच गोवा संघाकडून ५८व्या मिनिटाला थोंगखोहिसेम हाओकिपने गोल करत बरोबरी केली.

८७व्या मिनिटाला जॉफ्रे गोन्झालेझने शानदार गोल करत गोव्याला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. हा गोल जेतेपदासाठी पुरेसा ठरेल या विश्वासाने सहमालक विराट कोहलीने प्रचंड जल्लोष साजरा केला. गोल करण्यासाठी चेन्नईचे खेळाडू आतूर होते. या झटापटीत गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या हातून स्वयंगोल केला. चेन्नईच्या आघाडीपटूंना रोखताना लक्ष्मीकांतचा हात चेंडूला लागून तो गोलपोस्टमध्ये गेला. पंचांनी स्वयंगोल ठरवताच गोव्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली तर चेन्नई चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. २-२ अशी बरोबरीची कोंडी शूटआऊटमध्ये जाणार अशी चिन्हे असताना चेन्नईचा हुकूमी एक्का स्टीव्हन मेन्डोझाने भरपाई वेळेत गोल करत थरारक विजयावर शिक्कामोर्तब केले.

प्रचंड पावसामुळे, चेन्नई संघाने पुण्यात सराव केला आणि त्यांच्या लढती अन्य ठिकाणी खेळवण्यात आल्या. मात्र मार्को मॅटेराझीच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाने सर्व अडथळ्यांवर मात करत अनोखा वस्तुपाठ सादर केला. साखळी लढतींमध्ये गुणतालिकेत तळाशी फेकलेल्या गेलेल्या चेन्नईने जिद्दीने पुनरागमन करत सलग चार लढती जिंकत बाद फेरी गाठली. त्यानंतर सातत्यपूर्ण प्रदर्शनासह चेन्नईने आयएसएल स्पर्धेला नवा विजेता मिळवून दिला.

चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार मेन्डोझाला गोल्डन बूट पुरस्काराने गौरवण्यात आले. मेन्डोझा हिरो ऑफ द लीग सन्मानाचाही मानकरी ठरला. चेन्नईचा गोलरक्षक इडेल बेटेला गोल्डन ग्लोव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चेन्नईचाच जेजे लालपेखुला सवरेत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai win in indian super league
First published on: 21-12-2015 at 01:16 IST