‘चेस इन स्कूल’च्या विकासासाठी धोरण
विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून बुद्धिबळाचे प्रशिक्षण मिळावे आणि या खेळाचा अधिक प्रसार व्हावा या उद्देशाने चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ‘चेस इन स्कूल’ ही संकल्पना अस्तित्वात आली. मात्र या चार वर्षांचा आढावा घेतल्यास ही योजना फसलेल्याचे चित्र दिसत आहेत. या चुकांचा अभ्यास करून पुन्हा या योजनेला संजीवनी देण्यासाठी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘चेस इन स्कूल’च्या विकासासाठी शिक्षकांनाच बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेकडूनही त्याला मदत मिळणार आहे.
‘चेस इन स्कूल योजनेला उभारी देण्यासाठी शाळेतील शिक्षकांना ऑनलाइन बुद्धिबळ प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या ‘चेस इन स्कूल’ योजनेची समिती एक कार्यक्रम आखून देणार आहे आणि त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल,’ अशी माहिती अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदार व राष्ट्रीय चेस इन स्कूल समितीचे अध्यक्ष रवींद्र डोंगरे यांनी दिली. प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात चेस इन स्कूलची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यानंतर जवळपास २०० हून अधिक शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता, परंतु आता ही संख्या १०० ते १२५ इतकी झाली आहे. त्यामुळे या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. ‘आपल्या प्रशिक्षकांना जागतिक संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेण्यासाठी पाठवत होतो. पण हे प्रशिक्षक किती ठिकाणी प्रशिक्षण देणार, यावर मर्यादा येऊ लागल्या. आता शिक्षकांनाच प्रशिक्षण मिळणार असल्यामुळे चेस इन स्कूल संकल्पनेला पुन्हा उभारी मिळेल. शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिल्यानंतर त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य रीतीने होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संघटनेची आहे. त्यामुळे देखरेख करण्यासाठी प्रमुख नेमणार आहे,’ असे डोंगरे यांनी सांगितले.
मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पध्रेचे आयोजन २६ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील माऊंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले असून १७ देशांतील खेळाडूंनी स्पध्रेत सहभाग घेतला आहे. यामध्ये १६ पुरुष ग्रँडमास्टर, ४ महिला ग्रँडमास्टर आणि ११ आंतरराष्ट्रीय मास्टर्स यांचा समावेश आहे. यासह १३ वर्षांखालील मुलांसाठीही कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदा याला, तर कनिष्ठ गटात डी. गुकेश याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. संदीपनसमोर ग्रँडमास्टर दीप्तयान घोष (भारत), डेव्हिर्ड अल्बेटरे (इटली), बेर्नाडस्की व्हिटालिय, सिव्हूक व्हिटाली, टुखाएव्ह अॅडम, नेव्हेरोव्ह व्हॅलेरिटी (युक्रेन) आदींचे आव्हान आहे. महिलांमध्ये भारताच्या भक्ती कुलकर्णी आणि निशा मोहोटासह पोलंडची ग्रँडमास्टर टोमा कटार्झिनाने सहभाग निश्चित केला आहे.
महाराष्ट्रातील वादावर रविवारी निर्णय
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत सध्या सुरू असलेल्या वादावर रविवारी चेन्नईत होणाऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या बैठकीत निर्णय येण्याची शक्यता आहे.