चेन्नई : महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाला रविवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला पोलंडने १.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले.

भारत ‘अ’ संघातील कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव या अनुभवी खेळाडूंचे सामने बरोबरीत सुटले. मात्र, आर. वैशाली पराभूत झाली. ‘ब’ संघाने स्वित्र्झलडवर ४-० अशी, ‘क’ संघाने इस्टोनियावर ३-१ अशी मात केली.

खुल्या विभागात, भारताच्या ‘अ’ संघाने ब्राझीलला ३-१ असे पराभूत केले. भारताच्या ‘ब’ संघाला अझरबैजानने २-२ असे बरोबरीत रोखले. डी. गुकेशची सलग आठ विजयांची मालिका खंडित झाली. ‘क’ संघाने पेराग्वेला ३-१ असे नमवले.

आनंद फिडेच्या उपाध्यक्षपदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची रविवारी जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) उपाध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच अर्कादी द्वोर्कोव्हिच यांची ‘फिडे’च्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या वेळीच घेण्यात आलेल्या ‘फिडे’च्या निवडणुकीत द्वोर्कोव्हिच यांना १५७ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी आद्रेइ बॅरीशपोलेट्स यांना केवळ १६ मते मिळवता आली.