रघुनंदन गोखले (माजी बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक)

कोणत्याही सांघिक स्पर्धेत, मग ती कोणत्याही खेळाची का असेना, प्रत्येक खेळाडू आपल्यावरची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडतो, त्या वेळेस त्यांच्या संघास यश मिळतेच! गँजेस या संघाच्या यशामागचे हेच रहस्य आहे! महाराष्ट्राचा अनुभवी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे या संघाचा व्यवस्थापक आहे. कर्णधार आनंदने पहिल्याच फेरीत यान-क्रिस्टॉफ डुडाला हरवले होते आणि नंतर त्याने इयान नेपोम्नियाशीच्या विरुद्ध थोडीही जोखीम पत्करली नाही. जरी त्याच्या संघाचा हुकुमी एक्का असलेली होउ यिफान माजी महिला विश्वविजेत्या टॅन झोंगीकडून पराभूत झाली असली, तरी लेनियर डोमिंगेझ पेरेझने बालन अलास्कन नाईट्सच्या तेमूर राजाबोव्हचा धुव्वा उडवून बरोबरी साधली. आजवर लय न सापडलेल्या रशियन आंद्रे एसिपेंकोने रौनक साधवानीला पराभूत करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली, ती आक्रमक खेळणाऱ्या बेला खोटेनाश्विलीने वाढवली. आनंदच्या संघाची देहबोली आत्मविश्वासपूर्ण आहे, पण त्यात उद्धटपणा अथवा आक्रमकता नाही. आतापर्यंत प्रत्येकाने आपले काम चोख बजावलेले आहे आणि त्यामुळेच गँजेस ग्रँडमास्टर्स हा संघ सरस राहिला आहे.

मॅग्नस कार्लसनच्या संघावर प्रकाशझोत राहणार हे तर स्वाभाविक होते आणि त्यात त्याच्या संघात गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि प्रज्ञानंद सारखे भावी जगज्जेते समजले जाणारे युवक! असे असूनही त्यांचा अल्पाइन वॉरियर्स हा संघ त्यांच्या प्रतिभेला न्याय देऊ शकणारा खेळ करू शकत नाही. याचे कारण त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांचे दडपण! ऑलिम्पियाडमध्ये पहिल्या पटावरील सुवर्णपदक विजेता आणि या वर्षीच्या आशियातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक विजेता गुकेश तीनपैकी दोन लढती हरला आहे आणि एका लढतीत निव्वळ नशिबानेच त्याला बरोबरी साधता आली आहे. अशा वेळी त्याला समजावून सांगण्याचे काम मॅग्नस कार्लसनचे आहे. गुकेश अतिआक्रमक खेळायचा प्रयत्न करतो आणि त्याचा फटका गुकेशला बसत आहे. रिचर्ड रॅपपोर्टने ज्याप्रकारे त्याला नमवले होते, त्या डावानंतर गुकेशने काहीतरी नक्कीच शिकले पाहिजे. अर्जुन एरिगेसी हा दुसरा प्रतिभावान खेळाडू! पण तीन लढतीनंतर त्याला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. तेमूर राजाबोव्हचाकडून हरणारा अर्जुन अजूनही चाचपडतो आहे. या पार्श्वभूमीवर प्रज्ञानंदला सूर गवसला आहे. विशेषत: जोनास बुहल बजेरे विरुद्धचा त्याचा डाव हा प्रथम उत्कृष्ट बचाव, नंतर प्रतिहल्ला आणि शेवटी सुंदर एंड गेम यांचे प्रात्यक्षिक होते.

महिलांमध्ये कोनेरू हम्पीने हातातोंडाशी आलेला विजय घालवला. तो पण माजी जगज्जेत्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकविरुद्ध! आज जागतिक क्रमवारीत हम्पी दुसऱ्या स्थानावर आहे. तिला सूर मिळण्यासाठी तिचे सहकारी प्रार्थना करत असतील. कारण हम्पी ही अशी खेळाडू आहे की ती कोणालाही कधीही हरवू शकेल. सामन्यातील सर्वोत्कृष्ट लढाईचा मान जातो लेवोन अ‍ॅरोनियन विरुद्ध मॅग्नस कार्लसन लढतीकडे! बुद्धिबळातील मेसी म्हणून गौरवला गेलेला लेवोन मॅग्नसला कचाटय़ात पकडतो त्यावेळी ही लढत अत्युच्च पातळीवर जाणार हे प्रेक्षकांच्या लक्षात येते. पण मॅग्नस हा मॅग्नस आहे. त्याने सर्वस्व पणाला लावून बचाव केला आणि जरी हे द्वंद्व बरोबरीत सुटले, तरी या सामन्याने प्रेक्षकांना पूर्ण आनंद दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.