पीटीआय, चेन्नई : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चीनच्या वे यीला २.५-१.५ असे नमवत चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. १६ वर्षीय प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत अनिश गिरीशी (हॉलंड) सामना होईल. अन्य उपांत्य लढतीत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनपुढे चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असेल. गिरी आणि कार्लसन यांनी उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे आर्यन टोरी (नॉर्वे) आणि डेव्हिड अ‍ॅन्टोन गुजारो (स्पेन) यांचा पराभव केला. लिरेनने अझरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्हला २.५-१.५ असे पराभूत केले.

प्रज्ञानंदने यीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याचा पहिला डाव ९० चालींमध्ये जिंकला. तसेच त्याने दुसऱ्या गेममध्येही बाजी मारत चार डावांच्या या लढतीत २-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर तिसऱ्या डावात यीने पुनरागमन करताना विजय नोंदवला. मात्र, चौथा डाव बरोबरीत सुटल्याने प्रज्ञानंदला आगेकूच करण्यात यश आले.