scorecardresearch

चेतन शर्मा निवड समिती अध्यक्षपदी कायम; समितीत एस. शरथ, सलिल अंकोला, सुब्रतो बॅनर्जी, शिव सुंदर दास यांचा समावेश

शर्मा यांनी निवड झाली असली तरीही त्यांच्या समितीत नवीन चेहरे पाहण्यास मिळतील.

चेतन शर्मा निवड समिती अध्यक्षपदी कायम; समितीत एस. शरथ, सलिल अंकोला, सुब्रतो बॅनर्जी, शिव सुंदर दास यांचा समावेश
चेतन शर्मा

पीटीआय, नवी दिल्ली
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संपूर्ण निवड समिती बरखास्त केल्याच्या दोन महिन्यांनंतर चेतन शर्मा यांना शनिवारी वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा देण्यात आली. शर्मा यांनी निवड झाली असली तरीही त्यांच्या समितीत नवीन चेहरे पाहण्यास मिळतील.

दक्षिण विभागातून कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष एस. शरथ यांना स्थान देण्यात आले आहे. समितीत पूर्व विभागातून माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी, पश्चिम विभागातून सलिल अंकोला आणि मध्य विभागातून कसोटी सलामी फलंदाज शिव सुंदर दास यांना स्थान देण्यात आले आहे. दासने ओदिशाकडून खेळल्यानंतर विदर्भचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे, पूर्व विभागाचा खेळाडू असूनही तो मध्य विभागाच्या प्रतिनिधित्वासाठी पात्र ठरला. त्याचा सहकारी हरिवदर सिंगनेही अर्ज दाखल केले होता, मात्र मुलाखतीनंतरही त्याचा विचार करण्यात आला नाही.

‘‘मंडळाने निवड समितीच्या पाच पदांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ ला आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात दिली होती. या पदांसाठी जवळपास ६०० अर्ज आले. अर्जाच्या छाननीनंतर आणि चर्चेअंती क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) मुलाखतीसाठी अकरा जणांची निवड केली. मुलाखतीनंतर ‘सीएसी’ने पुरुषांच्या निवड समितीसाठी वरील उमेदवारांच्या नावाची शिफरास केली,’’ असे ‘बीसीसीआय’ सचिव जय शाह यांनी निवेदनात म्हटले आहे. निवड समिती अध्यक्षाला एक कोटीहून अधिकची रक्कम मिळत नसल्याने ‘बीसीसीआय’ला मोठय़ा नावांना या पदासाठी आकर्षित करण्यात अपयश आले.

दास आणि शर्मा या दोघांनीही २३ कसोटी सामने खेळले. मात्र, शर्मा हे ६५ एकदिवसीय (दास चार सामने) सामने खेळले. शर्मा यांनी कसोटीत १९८४ मध्ये, तर दास यांनी कसोटीत २००० मध्ये पदार्पण केले. तमिळनाडूचे माजी कर्णधार असलेले शरथ यांनी भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. ‘‘शरथ यांनी १९ वर्षांखालील क्रिकेट जवळून पाहिले आहे आणि त्यांना कनिष्ठ स्तरावरील खेळाडूंबाबत माहिती आहे. त्याचा फायदा निवड समितीला होईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. बॅनर्जी यांनी गेल्या वेळीही पदासाठी अर्ज केला होता, मात्र देबाशीष मोहंतीमुळे त्यांची संधी हुकली होती. बॅनर्जी हे नावाजलेले गोलंदाजी प्रशिक्षक आहेत आणि सध्या ते भारतीय गोलंदाज उमेश यादवचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. तसेच, रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाचे ते गोलंदाजी प्रशिक्षक होते.

मुंबई रणजी संघाच्या निवड समिती अध्यक्षपदाच्या अनुभवाचा फायदा सलिल अंकोला यांना झाला आहे. गेल्या समितीच्या कार्यकाळात पश्चिम विभागाकडून एक वर्षांसाठी कोणीच प्रतिनिधी नव्हता. कारण, अॅबे कुरूविला यांनी कनिष्ठ आणि वरिष्ठ निवड समिती मिळून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 00:58 IST

संबंधित बातम्या