Cheteshwar Pujara On Team India Defeat Against South Africa: भारतीय संघाला गेल्या वर्षी मायदेशात खेळताना न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. कसोटी क्रिकेटमध्ये भारतात येऊन भारतीय संघाला पराभूत करणं मुळीच सोपं नाही. पण न्यूझीलंडने भारतीय संघाचा सुपडा साफ केला होता. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाकडे हा सामना जिंकण्याची सोपी संधी होती. पण फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे हातचा सामना निसटला. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर चेतेश्वर पुजारा सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना चेतेश्वर पुजारा म्हणाला, “भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये पराभव झाला, तर ते आपण समजू शकतो. कारण भारतीय संघ संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे. पण यामुळे भारतातच पराभव होतोय, हे पचवणं जरा कठीण आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “तुम्ही सर्व खेळाडूंचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड काढून पाहा, जसं की यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि सर्वच खेळाडू. या सर्व खेळाडूंचा मायदेशातील रेकॉर्ड दमदार आहे. तरीदेखील आपण हरतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा सामना चांगल्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला असता, तर निकाल वेगळा लागू शकला असता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “सामना चांगल्या खेळपट्टीवर खेळवा. जर भारतीय अ संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा मुख्य संघ जरी आमनेसामने आले तरीदेखील भारतीय अ संघ जिंकेल. भारतात इतके टॅलेंटेड खेळाडू आहेत. पण तुम्ही म्हणता, भारतीय संघ संक्रमणाच्या टप्प्यातून जात असल्यामुळे पराभव झाला. हे पचणारं नाही.” असं चेतेश्वर पुजारा म्हणाला.
भारतीय संघाचा पराभव
या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपल होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा पहिला डाव १८९ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने ३० धावांनी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या १५३ धावा करता आल्या. भारतीय संघाला विजयासाठी १२४ धावा करायत्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव ९३ धावांवर आटोपला.
