scorecardresearch

Video: वडिलांनी शतक झळकावताच आनंदाने नाचू लागली चिमुकली; चाहत्यांनीही केले कौतुक

Cheteshwar Pujara Daughter Video: आपल्या वडिलांच्या कामगिरीमुळे चार वर्षांच्या अदितीला फारच आनंद झाला.

Video: वडिलांनी शतक झळकावताच आनंदाने नाचू लागली चिमुकली; चाहत्यांनीही केले कौतुक
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

भारतीय कसोटी संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा आपल्या शांत आणि संयमी खेळासाठी ओळखला जातो. तोच पुजारा जर टी २० क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजासारखा चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना दिसला तर? इंग्लंडमध्ये ससेक्स आणि सरे क्रिकेट क्लबच्या सामन्या दरम्यान क्रिकेट चाहत्यांना हे दुर्मिळ दृश्य बघायला मिळाले. चेतेश्वर पुजारा गेल्या काही महिन्यांपासून ससेक्स क्रिकेट क्लबसाठी खेळत आहे. सरेविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग दुसरे शतक ठोकले आहे. पुजाराचे शतक पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मुलीने नाचून जल्लोष केला. तिच्या या व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून ससेक्स क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळत आहे. त्याच्याकडे संघाचे कर्णधारपही देण्यात आले आहे. इंग्लंडमधील प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने अप्रतिम कमगिरी केली आहे. सध्या सुरू असलेल्या ‘रॉयल लंडन वन-डे कप’मध्ये त्याने ससेक्ससाठी सलग दुसरे शतक झळकावले. सरे विरुद्धच्या सामन्यात त्याने १७४ धावा फटकावल्या. आपल्या वडिलांच्या या कामगिरीमुळे चार वर्षांच्या अदितीला फारच आनंद झाला. स्वत: चेतेश्वर पुजाराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अदितीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

ससेक्स विरुद्ध सरे सामन्यानंतर, पुजाराने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. “आज संघाच्या विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. संपूर्ण संघाने उत्कृष्ट खेळ केला,” अशा कॅप्शनसह पुजाराने इन्स्टाग्राम हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लहानगी अदिती पुजाराच्या शतकानंतर फारच निरागसपणे आनंद साजरा करताना दिसली. क्रिकेट चाहत्यांना अदितीची कृती फारच भावली आहे. त्यांनी व्हिडिओवर लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा – MS Dhoni Instagram DP: “धन्य: अस्मि भारतत्वेन”; स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त एमएस धोनी सोशल मीडियावर झाला सक्रिय

चेतेश्वर पुजारा एप्रिल आणि मे महिन्यात ससेक्स संघाकडून क्रिकेट खेळला. या काळात ससेक्ससाठी त्याने दोन द्विशतके आणि दोन शतके झळकावून इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले होते. कसोटी सामना संपल्यानंतर तो पुन्हा एकदा ससेक्स संघात सामील झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या