ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने दमदार द्विशतक ठोकले आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजाराने संपूर्ण तिसरा दिवस आणि चौथ्या दिवशीच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. भारतीय संघाला सुस्थितीत पोहोचल्यावर चेतेश्वर पुजारा माघारी परतला. तब्बल ५२५ चेंडूंचा सामना करत पुजाराने २०२ धावा केल्या. पुजाराने सातव्या विकेटसाठी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहासोबत १९९ धावांची भागिदारी रचली. कांगारुंना ही जोडी फोडण्यासाठी तब्बल ७७ षटके लागली.

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत एक बाद ९१ अशा सुस्थितीत असताना चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १० धावांवर नाबाद असलेला पुजारा तिसऱ्या दिवशीदेखील नाबाद परतला. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला झटपट गुंडाळण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. मात्र पुजाराने साहाच्या साथीने ऑस्ट्रेलियाचे इरादे रांचीतील मातीत मिळवले. तिसऱ्या दिवशीप्रमाणेच पुजाराने खेळपट्टीवर पाय रोवले आणि प्रतिस्पर्धी गोलंदाज हतबल झाले. भारतीय संघ तब्बल ३६० धावांनी पिछाडीवर आला असताना पुजारा मैदानावर उतरला होता आणि जेव्हा पुजारा परतला तेव्हा भारताकडे ७६ धावांची आघाडी होती. खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहणे काय असते, याचा प्रत्यय पुजाराने दिला. राहुल द्रविडचा ४९५ चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम यावेळी पुजाराने मोडून काढला.

राहुल द्रविडचा ४९५ चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम यावेळी पुजाराने मोडून काढला. २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना रावळपिंडी कसोटीत राहुल द्रविडने ४९५ चेंडूंचा सामना केला होता. त्यानंतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला इतक्या चेंडूंचा सामना करता आला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ५२५ चेंडूंचा सामना करत चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनवेळा द्विशतक ठोकण्याची कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा हा तिसरा भारतीय फलंदाज आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना ही कामगिरी करता आली आहे.