जवळपास सर्वच क्षेत्रांत चिनी ड्रॅगनचा विळखा पडू लागला आहे. क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. दोन दशकांपूर्वी चीनने कात टाकली आणि क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आशियाई स्पर्धा असो वा ऑलिम्पिक, पदकतालिकेवर चीनचे वर्चस्व दिसून आले. इन्चॉन येथील आशियाई स्पर्धाही चीनच्या सामथ्र्यशाली क्रीडा महासत्तेची नांदी होती. आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट करत आता २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही वर्चस्व गाजवण्यासाठी चीन सज्ज झाला आहे.
चीनने इन्चॉन आशियाई स्पर्धेसाठी गेल्या स्पर्धेच्या तुलनेत कमी जणांचा चमू पाठवला तरी पदकतालिकेतून चीनचे अव्वल स्थान हिरावून घेणे कुणालाही जमले नाही. मायदेशात २०१०मध्ये झालेल्या गुआंगझाऊ आशियाई स्पर्धेत चीनने १९९ सुवर्णपदकांसह एकूण ४१६ पदके मिळवीत दादागिरी केली होती. चीनने या वेळी १५१ सुवर्णपदकांसह ३४२ पदके पटकावली. पण चीनची सुवर्णपदकांची संख्या जवळपास ४८ पदकांनी घटली, ही चीनसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. चीनने या वेळी खर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी खेळाडूंच्या संख्येला कात्री लावली तरी महिलांच्या व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलमध्ये यजमान दक्षिण कोरियाने चीनवर हुकूमत गाजवली. चीनच्या महिला व्हॉलीबॉल संघाला १९९८ नंतर प्रथमच अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. यजमान कोरियाने गेल्या वेळेप्रमाणेच या वेळीही पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले, पण घरच्या मैदानावर स्पर्धा होऊनही दक्षिण कोरियाला पदकांच्या संख्येत म्हणावी तितकी भर घालता आली नाही. गुआंगझाऊ आशियाई स्पर्धेत कोरिया ७६ सुवर्णपदकांनिशी २३२ पदकांसह दुसऱ्या स्थानी होता. या वेळी चीन आणि कोरियामधील असलेला पदकांचा फरक कमी करण्याचे उद्दिष्ट कोरियाने बाळगले होते. पण मायदेशात त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कोरियाला ७९ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ८४ कांस्यपदकांसह एकूण २३४ पदकांनिशी दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गेल्या वेळच्या तुलनेत जपानची पदकांची संख्या रोडावली, मात्र ४७ सुवर्णपदकांसह ते २०० पदकांनिशी तिसऱ्या स्थानावर कायम राहिले. इराण आणि कझाकस्तान यांच्यात चौथ्या-पाचव्या क्रमांकासाठीची चुरस या वेळीही रंगली. कझाकस्तानने (८४ पदके) मात्र या वेळी इराणला मागे टाकून चौथे स्थान प्राप्त केले. गेल्या वेळी सहाव्या स्थानावर असलेला भारताचा संघ या वेळी मात्र आठव्या क्रमांकावर फेकला गेला. भारताने ११ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह एकूण ५७ पदके मिळवली.
यजमान दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांचे नाते म्हणजे विळी-भोपळ्याचे. दक्षिण कोरियात उत्तर कोरियाच्या लोकांना येण्याची परवानगी नसताना स्पर्धेच्या नियमांनुसार उत्तर कोरियाने या स्पर्धेसाठी १५० अ‍ॅथलिट्सचा चमू पाठवला होता. उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करत ११ सुवर्णपदकांना गवसणी घातली. विशेष म्हणजे, सुवर्णपदक पटकावणाऱ्या प्रत्येकाने खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले उत्तर कोरियाचे नेते किम जाँग अन यांचे गुणगान गायले. महिला फुटबॉलच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाने जपानवर मिळविलेला ३-१ ने विजय हे आशियाई स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाने उत्तर कोरियावर केलेली मात, हा आशियाई स्पर्धेतील सर्वात थरारक प्रसंग ठरला.
जलतरणात जोसेफ इसाकने सिंगापूरला २४ वर्षांनंतर पहिले पदक मिळवून दिले. यापूर्वी १९९०च्या बीजिंग आशियाई स्पर्धेत अँग पेंग सिआँगने सिंगापूरला रौप्यपदक मिळवून दिले होते. २०१२ लंडन ऑलिम्पिकसाठी सौदी अरेबियाने दोन महिला खेळाडूंना संघात निवडले होते, पण इन्चॉन आशियाई स्पर्धेसाठी सौदी अरेबियाने १९९ जणांच्या चमूत एकाही महिला खेळाडूला स्थान दिले नव्हते. पण पुरुष खेळाडूंच्या सौदी अरेबियाने ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्यपदकांसह ७ पदके मिळवत छाप पाडली.
स्पर्धा म्हटली की वादविवाद आलेच. इन्चॉन आशियाई स्पर्धाही त्याला अपवाद ठरली नाही. हिजाब (चेहरा झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यास मज्जाव केल्यामुळे कतारच्या महिला बास्केटबॉल संघाने एकही सामना न खेळता स्पर्धेतून माघार घेतली. त्याचबरोबर सहा अ‍ॅथलिट्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळले. त्यात हातोडाफेकी आणि वुशूमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या चीनच्या खेळाडूंचा समावेश होता. दक्षिण कोरियाच्या जीना पार्क हिच्याविरुद्धच्या लढतीत वर्चस्व गाजवूनही भारताची महिला बॉक्सर एल. सरिता देवी हिला पंचांनी पराभूत केले. त्यामुळे मोठा वादंग माजला. सरिता देवीने पदकप्रदान सोहळ्यात आपले कांस्यपदक पार्क हिला बहाल करत धाडसी वृत्ती दाखवली, पण अखेर तिला या प्रकाराची माफी मागावी लागली.
राष्ट्रकुल, आशियाई किंवा ऑलिम्पिक स्पर्धा या यजमान देशाच्या भरभराटीसाठी आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी पोषक असतात, असे म्हटले जाते. पण यापैकी कोणत्याही स्पर्धेचे संयोजनपद सांभाळणे म्हणजे देशावर कर्जाचा डोंगर उभा करणे, ही वस्तुस्थिती आहे. आशियाई स्पर्धेचे संयोजक दक्षिण कोरिया आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेला आता आशियाई स्पर्धेच्या संयोजनातील वाढत्या खर्चाची चिंता जाणवू लागली आहे. इन्चॉनमधील संयोजकांनी आशियाई स्पर्धेचे आयोजन कमी खर्चात करण्याचे उद्दिष्ट बाळगले होते, पण तरीही आशियाई स्पर्धेच्या संयोजनाचा खर्च २ अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. आशियाई स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि वाढलेले खर्चाचे प्रमाण पाहता, व्हिएतनामने २०१९ मधील आशिया स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतली आहे. भारतानेही या स्पर्धेसाठी बोली लावण्याचे ठरवले होते, पण संयोजनपदाच्या शर्यतीतून भारतानेही माघार घेतली आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आता संयोजक देशांना मेहनत घ्यावी लागणार आहे.