सिनसिनाटी : चौथ्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या डॅनिल मेदवेदेव्हचा पराभव करत वेस्टर्न अॅण्ड सदर्न खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
त्सित्सिपासने चुरशीच्या लढतीत मेदवेदेव्हवर ७-६ (८-६), ३-६, ६-३ असा विजय मिळवला. अंतिम फेरीत त्याचा क्रोएशियाच्या बोर्ना कोरिचशी सामना होईल. कोरिचने उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या कॅमेरून नॉरीला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवले.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्सित्सिपासने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेव्हने पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला. मग तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये त्सित्सिपासने आपला खेळ उंचावत सामना जिंकला. या वर्षी कोणत्याही स्पर्धेची त्याने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
क्विटोव्हा-गार्सियाची आगेकूच
पेट्रा क्विटोव्हा आणि कॅरोलिन गार्सिया यांनी वेस्टर्न अॅण्ड सदर्न स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत क्विटोव्हाने अमेरिकेच्या मॅडिसन किजवर ६-७ (६-८), ६-४, ६-३ अशी मात केली, तर गार्सियाने सहाव्या मानांकित अरिना सबालेंकाला ६-२, ४-६, ६-१ असे नमवले.