आयुष्यातील योग्य मार्गावर चालण्यासाठी गुरू हा लागतोच.. तुमच्याकडून झालेल्या चुका तो तुम्हाला दाखवतो, त्या चुका सुधारून घेतो.. तुमचे सारे भावविश्व बदलून टाकतो.. तुम्हाला समजून घेतो, तुम्हाला समजावतो.. तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडवतो.. आणि तुम्हाला गगनभरारी घेण्यासाठी सज्ज करतो.. एखादा खेळाडू मोठा झाल्यावर तोच साऱ्यांना दिसत असतो, पण त्याला घडवणारे हात मात्र प्रसिद्धीपासून चार हात लांब राहतात, कारण त्या खेळाडूच्या यशामध्ये त्याचे यश असते.. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होऊन बॅडमिंटन इतिहासात ‘न भूतो, न भविष्यती’ अशी कामगिरी सायना नेहवालने करून दाखवली. चीनची मक्तेदारी मोडून अव्वल स्थानावर विराजमान होणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली़ तिच्या या यशाचे सर्वाकडून कौतुक झाले, अगदी पंतप्रधानांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत; परंतु सायनाच्या या ऐतिहासिक कामगिरीत तिचे प्रशिक्षक विमल कुमार यांचा सिंहाचा वाटा आहे. सायनाने यशाचे शिखर पादाक्रांत करावे, यासाठी विमल कुमार यांनी तिला मार्गदर्शन तर केलेच, पण तिला मार्गदर्शन करण्यात आपण कुठेही कमी पडू नये, यासाठी या गुरूने आपले वजन घटविले.
विमल कुमार यांच्याच मार्गदर्शनाखाली सायनाने ना केवळ चीनच्या खेळाडूंच्या वर्चस्वाला सुरुंग लावला, तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले. प्रशिक्षकांबाबत सायना म्हणाली की, ‘‘माझ्या यशाचे श्रेय प्रशिक्षक विमल कुमार यांना जाते. मला प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. या परिश्रमात त्यांनी स्वत:चे वजनही बऱ्याच प्रमाणात कमी केल़े तसेच प्रकाश सरांच्या सल्ल्यांचीही मला फार मदत मिळाली,’’ असे मत सायनाने व्यक्त केले. भारतीय खुली बॅडमिंटन स्पध्रेच्या अंतिम फेरीपूर्वीच सायनाने अव्वल स्थान पटकावले. या आनंदात वाहून न जाता सायनाने अंतिम लढतीवर लक्ष्य केंद्रित केले आणि त्यामुळेच तिने पहिल्यांदाच या स्पध्रेचे जेतेपदही पटकावून भारतीयांचा आनंद द्विगुणित केला. ‘‘मला कामगिरीत सातत्य राखायचे आहे. तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. अव्वल स्थान पटकावणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मला मिळाला़ हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नाही,’’ अशी प्रतिक्रिया सायनाने दिली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2015 रोजी प्रकाशित
शिष्यासाठी काहीही..
आयुष्यातील योग्य मार्गावर चालण्यासाठी गुरू हा लागतोच.. तुमच्याकडून झालेल्या चुका तो तुम्हाला दाखवतो, त्या चुका सुधारून घेतो..
First published on: 01-04-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coach lost weight in making me world no 1 says saina nehwal