गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत धुरक्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. दिल्लीतील हवा गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्यामुळे अरविंद केजरीवाल सरकारने एक दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली होती. सकाळच्या वेळी दिल्लीच्या रस्त्यावर प्रचंड धुरक्याचं साम्राज्य असल्यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाल्याचंही समोर आलंय. काही दिवसांपूर्वी यमुना एक्स्प्रेस हायवेवर धुरक्यामुळे अंदाजे २०-२२ गाड्यांचा अपघात झाला होता. केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. दिल्ली सरकार वाहनांसाठी राबवलेली सम-विषम योजना पुन्हा राबवण्याच्या विचारात आहे.

दिल्लीतील प्रदूषित हवेबद्दल क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चिंता व्यक्त केली आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आपल्यालाही भान असायला हवे, असे हरभजन सिंगने बोलून दाखवलं. आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण करतो, आपल्या कृतीचा आजूबाजूच्या परिस्थितीवर, पर्यावरणावर काय परिणाम होतोय याचा आपण विचारही करत नाही. मग एखाद्या दिवशी अचानक एखादी समस्या समोर उभी राहते आणि आपले डोळे उघडतात. दिवसेंदिवस ही परिस्थिती आणखी बिघडत चालली असल्याचंही हरभजन म्हणाला.