रशिया (युरोप)
यजमान म्हणून रशियाने या स्पर्धेची पात्रता २०१०सालीच निश्चित केली होती. रशिया पहिल्यांदाच कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत खेळत आहे. विश्वचषक आणि यूएएफा युरो स्पध्रेत रशिया सातत्याने सहभाग घेत आहे, परंतु त्यांना विश्वचषक स्पध्रेच्या साखळी सामन्याचा अडथळा पार करण्यात अपयश आले आहे. २००८च्या युरो स्पध्रेत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेतही त्यांना साखळी गटातच गाशा गुंडाळावा लागला. ‘अ’ गटात समावेश असलेल्या रशियाला पोर्तुगाल आणि मेक्सिकोने नमवले. त्यामुळे त्यांना तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले.
रोड टू रशिया २०१७
यजमान देश आपोआप कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेसाठी पात्र ठरतो. २०१८ साली रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेची तयारी म्हणून कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेकडे पाहिले जात आहे.
प्रमुख खेळाडू
इगोर अॅकिन्फीव्ह (गोलरक्षक), डेनिस ग्लुशाकोव्ह (मध्यरक्षक) आणि फिओडोर स्मोलोव्ह (आघाडीपटू)
आत्तापर्यंत केवळ तीन यजमान देशांना कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेचे जेतेपद पटकावता आले आहे. मेक्सिकोने १९९९ मध्ये, फ्रान्सने २००३ मध्ये आणि ब्राझीलने २०१३मध्ये बाजी मारली आहे.
जर्मनी (युरोप )
ब्राझिलमध्ये झालेल्या २०१४च्या फिफा विश्वचषक स्पध्रेचे जेतेपद पटकावून जर्मनीने रशियात होणाऱ्या कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली होती.
रोड टू रशिया २०१७
जर्मनीने याआधी दोन वेळा कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत सहभाग घेतला आहे. मेक्सिको येथे १९९९ मध्ये झालेल्या स्पध्रेत त्यांना गट साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. लॉथर मॅथॉस, जेन्स लेहमन आणि युवा मिचेल बलॅक या खेळाडूंचा समावेश असलेल्या जर्मनीच्या संघाला पहिल्याच लढतीत ब्राझीलकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी २-० असा विजय मिळवत पुनरागमन केले, परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले आणि अमेरिकेने २-० असा विजय मिळवून जर्मनीचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले. सहा वर्षांनंतर घरच्या मैदानावर जर्मनीने कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेतील सहभाग निश्चित केला. जुर्गन क्लिन्समन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या संघाने ऑस्ट्रेलिया (४-३) आणि टुनिसिया (३-०) यांच्यावर मात केली, तर अर्जेटिनाविरुद्ध त्यांना २-२ अशी बरोबरी स्वीकारावी लागली. उपांत्य फेरीत मात्र त्यांना ब्राझीलने पराभूत केले. तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत त्यांनी अतिरिक्त वेळेत मेक्सिकोवर ४-३ असा विजय मिळवला.
प्रमुख खेळाडू
मार्क-अॅण्ड्रे टेर स्टीगन (गोलरक्षक), श्कोड्रन मुस्ताफी (बचावपटू), ज्युलियन ड्रॅक्सलर (मध्यरक्षक) व टिमो वेर्नेर (आघाडीपटू)
आकडेवारी
२००५ कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेतील जर्मन संघातील तीन खेळाडूंचा २०१४ साली विश्वविजेत्या संघात समावेश होता.
ऑस्ट्रेलिया (आशिया)
ओशियाना आणि आशियाई महासंघाकडून ऑस्ट्रेलियाचा संघ कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत प्रतिनिधित्व करत आहे. २०१५च्या एएफसी आशियाई चषक स्पध्रेत ऑस्ट्रेलियाने कोरियावर २-१ असा विजय मिळवून हा मान पटकावला. याआधी ऑस्ट्रेलियाने तीन वेळा कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत सहभाग घेतला आहे. १९९७ साली त्यांनी उपविजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २००१मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. २००५मध्ये त्यांना सलग तीन पराभवामुळे स्पध्रेतून लवकरच गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा त्यांचे आव्हान गटातच संपुष्टात आले. त्यांना ‘ब’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
प्रमुख खेळाडू
टिम चॅहिल, मॅट रियान, मॅथ्यू लेकिए, माईले जेडिनॅक
कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत १८ सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाला पाचमध्ये विजय मिळवण्यात यश आले.
पोर्तुगाल (युरोप)
पोर्तुगालने अतिरिक्त वेळेत यजमान फ्रान्सला १-० असे नमवून यूएफा युरो २०१६ स्पध्रेचे जेतेपद पटकावले आणि या कामगिरीच्या जोरावर त्यांनी कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली. पहिल्यांदाच कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत खेळणाऱ्या पोर्तुगालने ‘अ’ गटातून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा ४-० असा धुव्वा उडवला.
प्रमुख खेळाडू
ख्रिस्तियानो रोनाल्डो (आघाडीपटू), पेपे (बचावपटू), रुई पॅट्रिसिओ (गोलरक्षक), नॅनी (आघाडीपटू), रेनाटो सांचेज (मध्यरक्षक)
पोर्तुगालने १५ पैकी ७ युरोपियन स्पध्रेत सहभाग घेतला आणि प्रत्येक वेळी त्यांनी गट साखळीचा पल्ला पार केला. १९८४ साली युरो स्पध्रेत पदार्पण करणाऱ्या पोर्तुगालने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. १९९६, २००० आणि २०१२मध्ये त्यांना उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही, परंतु २००४ साली घरच्या मैदानावर त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागेल. १२ वर्षांनतर त्यांची जेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात आली.
न्यूझीलंड (ओशियाना)
ओशियाना फेडरेशन चषक जिंकून न्यूझीलंडने कॉन्फेडरेशन स्पध्रेत प्रवेश मिळवला. चौथ्यांदा ते या स्पध्रेत सहभाग घेत आहेत.
प्रमुख खेळाडू
स्टीफन मॅरिनोव्हीक, कोस्टा बार्बारोसेस, ख्रिस वूड
चिली (दक्षिण अमेरिका)
२०१५ मध्ये कोपा अमेरिका स्पध्रेचे जेतेपद पटकावून चिलीने पहिल्यांदा कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत प्रवेश मिळवला. अंतिम लढतीत त्यांनी अर्जेटिनाला ४-१ असे नमवले. पहिल्यांदाच या स्पध्रेत खेळणाऱ्या चिलीने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. ‘ब’ गटात त्यांनी एक विजय आणि दोन अनिर्णीत निकालासह उपांत्य फेरीत धडक दिली. त्यांच्यासमोर पोर्तुगालचे आव्हान असणार आहे.
प्रमुख खेळाडू
अॅलेक्सिस सांचेज (आघाडीपटू), आर्टुरो व्हिडाल (मध्यरक्षक), जॉर्ज व्हॅलडिव्हीया (मध्यरक्षक), गॅरी मेडेल (बचावपटू), क्लाऊडीओ ब्राव्हो (गोलरक्षक).
वरिष्ठ गटात जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी चिलीला ९९ वष्रे वाट पहावी लागली.
कॅमेरून (आफ्रिका)
कॅमेरून संघ कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पध्रेत आफ्रिका खंडांचे प्रतिनिधित्व करत आहे. सीएएफ आफ्रिका चषक राष्ट्रीय स्पध्रेचे जेतेपद पटकावून कॅमेरूनने कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली. त्यांनी अंतिम फेरीत इजिप्तवर २-१ असा विजय मिळवला. कॅमेरून तिसऱ्यांदा कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत खेळत आहे. २००३साली त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून सर्वाना धक्का दिला होता, परंतु यजमान फ्रान्सने १-० असा विजय मिळवून त्यांच्या जेतेपदाच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. रशियात सुरू असलेल्या कॉन्फेडरेशन स्पध्रेत त्यांचे आव्हान गटातच संपुष्टात आले आहे.
प्रमुख खेळाडू
फॅब्रीस ओंडोआ (गोलरक्षक), निकोलस नीकौलौ (बचावपटू), बेंजामिन मौकांडजो (आघाडीपटू), ख्रिस्टियन बॅसोगोग (मध्यरक्षक).
आत्तापर्यंत एकदाही आफ्रिकन देशाला कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. कॅमेरूनला २००३मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते आणि त्यांच्या हेन्री याला गोल्डन गोलचा पुरस्कार देण्यात आला होता.
मेक्सिको (उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन)
उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन महासंघाच्या गोल्ड चषक स्पध्रेचे जेतेपद पटकावून मेक्सिकोने कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली. मेक्सिको सहाव्यांदा या स्पध्रेत खेळत असून त्यांनी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.
प्रमुख खेळाडू
ग्युलेर्मो ओचोआ (गोलरक्षक), हेक्टर मोरेनो (बचावपटू), अॅड्रेस गॉर्डेडो (मध्यरक्षक), कार्लोस व्हेला (आघाडीपटू), झेव्हियर हर्नाडेज (आघाडीपटू)
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा