मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) निवडणूक ठरल्याप्रमाणे २८ सप्टेंबरला होणार का, याबाबतचा प्रश्न मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेअंती ऐरणीवर होता.

‘एमसीए’च्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक बुधवारी केली जाणार आहे. त्यानंतरच कार्यक्रमपत्रिका निश्चित होऊ शकेल. परंतु सदस्यांच्या प्रश्नाबाबत ‘एमसीए’ सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याने निवडणुकीचे भवितव्य सध्या तरी अधांतरी आहे.

‘‘सर्व क्लब्जला धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करायची असते. ही नोंदणी नाही केली तर मान्यता रद्द होते. ‘एमसीए’शी संलग्न दीडशेहून अधिक क्लब्जची नोंदणी झालेली नाही. या क्लब्जला नोंदणी करण्याची इच्छाही नाही. कारण लोढा समितीने ही शिफारस केलेली नाही. परंतु संघटनेची घटना ज्यांनी तयार केली त्यांनी त्याचा समावेश केला. आम्हाला यातून सूट हवी, अशी सदस्यांची मागणी आहे. त्याकरिता खास याचिका (इंटरलॉक्युटरी अ‍ॅप्लिकेशन) ‘एमसीए’कडून सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे,’’ अशी माहिती ‘एमसीए’चे सचिव संजय नाईक यांनी दिली. ही याचिका फेटाळली गेल्यास नोंदणी करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी मागितला जाईल, असे नाईक यांनी सांगितले. याचप्रमाणे मुंबई प्रीमियर लीगचा आयुक्त आणि प्रशासक यांची निवडणूक निवडणुकीच्या दिवशीच होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.