भारताची माजी कर्णधार मिताली राज आणि मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात गेल्या २-३ दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मिताली राज हिने रमेश पोवार यांच्यावर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप एका पत्राद्वारे केला होता. या पत्रातील मजकूर सार्वजनिक व्हायला नको होता, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

मिताली राज हिने BCCI चे CEO राहुल जोहरी आणि महासंचालक साबा करीम यांना पात्र लिहून आपली खंत व्यक्त केली होती. त्यात प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप करण्यात आले होते. मितालीला या सर्व प्रकारातून जावे लागले याबाबत मला तिच्याबद्दल सहानुभूती आहे. पण या पत्रातील मजकूर हा सार्वजनिक व्हायला नको होता. आधी उपांत्य फेरीत तिला अचानक संघातून वगळले आणि त्यानंतर हे पत्राचे प्रकरण यामुळे तिचा हा आठवडा तणावपूर्ण ठरणार हे नक्की, असे ट्विट त्यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशिक्षक रमेश पोवार यांनी माझा अपमान केला. त्यांनी मला संघाबाहेर ठेवले. हरमनप्रीतशी माझे काहीही भांडण नाही. पण तिने मला वगळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, हे मला खटकले. त्यात भर म्हणून माजी कर्णधार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी यांनी माझ्याविरोधात आपल्या पदाचा गैरवापर केला आणि मला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाला एकप्रकारे सहकार्यच केले, असे आरोप तिने पत्राद्वारे केले होते.