AUS vs SA 3rd T20I: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून विजय मिळवला. यासह ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. या सामन्यात गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने दमदार गोलंदाजी केली. त्याने या डावात गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. यादरम्यान त्याने असा पराक्रम करून दाखवला आहे, जो याआधी कुठल्याही गोलंदाजाला करता आला नव्हता.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या सामन्यातील शेवटच्या २ षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १० धावा करायच्या होत्या. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून १९ वे षटक टाकण्यासाठी कॉर्बिन बॉश गोलंदाजीला आला. या षटकात त्याने दमदार गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या २ फलंदाजांना बाद केलं. त्याने बेन ड्वार्शियस आणि नॅथन एलिसला बाद करत माघारी धाडलं. २ गडी बाद करत असताना त्याने या षटकात एकही धाव खर्च केली नाही. यासह तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डबल विकेट मेडन विकेट टाकणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या ८ संघांमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसराच गोलंदाज ठरला आहे. याआधी २०२४ मध्ये झिम्बाब्वे विरूद्ध झालेल्या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोने दोन गडी बाद करून निर्धाव षटक टाकलं होतं.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांअखेर ७ गडी बाद १७२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून २६ चेंडूत ५३ धावांची दमदार फलंदाजी केली. तर रासी वान डर डुसेनने २६ चेंडूत नाबाद ३८ धावांची खेळी केली. तर ट्रिस्टन स्टब्सने २५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना नॅथन एलिसने ३१ धावा खर्च करून ३ गडी बाद केले. तर अॅडम झाम्पाने २ आणि जोश हेझलवूडने २ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १७३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलची बॅट चांगलीच तळपली. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत नाबाद ६२ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने ३, कगिसो रबाडा २ आणि क्वेना मफाकाने २ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने हा सामना २ गडी राखून आपल्या नावावर केला.