नवी दिल्ली : चीननंतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या करोना विषाणू संसर्गामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगला (आयपीएल) त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या काही दिवसांवर आयपीएल स्पर्धा येऊन ठेपल्यामुळे फ्रेंचायझींनी सावध पवित्रा अवलंबला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे जगभरात ३५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून भारतातील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच ही स्पर्धा घेण्याचे संयोजकांनी ठरवले आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या एकाही परदेशी खेळाडूने भारतात प्रवास करण्याविषयी आक्षेप घेतलेला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील जवळपास ६० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार असून या देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

‘‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती कोणत्याही परिस्थितीत टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी आग्रही असली तरी आयपीएल ही त्या तुलनेत फारच छोटीशी स्पर्धा आहे. त्यामुळे आयपीएलच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’’  असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. यंदाच्या आयपीएलला मुंबईत २९ मार्च रोजी सुरुवात होत आहे.

‘‘प्रत्येक सामन्याचा वैयक्तिकपणे विमा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तसेच कोणत्याही फ्रेंचायझीचे नुकसान होणार नाही. पण करोना विषाणूच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यास, संपूर्ण आयपीएल रद्द करण्याचा प्रश्नच नाही,’’ असे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दुआ यांनी सांगितले.

न्यूझीलंडच्या खेळाडूंना करोनाबाबतची माहिती मिळणार

करोना विषाणूचा संसर्ग वाढत असून इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट मंडळ अद्ययावत माहिती देणार आहे. ‘‘अद्ययावत घडामोडींची माहिती न्यूझीलंडच्या खेळाडूंना पुरवण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्कात असून जगभरातील घडामोडींची माहिती खेळाडूंपर्यंत पुरवण्यात येईल,’’ असे न्यूझीलंड मंडळाच्या रिचर्ड बुक यांनी सांगितले.

भारतीय तिरंदाजी संघाची आशिया चषकातून माघार

कोलकाता : भारतीय तिरंदाजी महासंघाने (एएआय) करोनाच्या धास्तीमुळे बँकॉक येथे रंगणाऱ्या आशिया चषक या जागतिक क्रमवारी स्पर्धेतून आपला संघ माघारी घेतला आहे. थायलंडमध्ये ८ ते १५ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. पाच महिन्यांच्या बंदीनंतर ही भारताची पहिली स्पर्धा होती. ‘‘करोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय क्रीडा प्राधिकरण तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती प्रवास करण्याबाबत साशंक आहे. त्यामुळेच आम्ही खेळाडूंच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन या स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले आहे,’’ असे एएआयचे महासचिव गुंजन अबरोल यांनी पत्राद्वारे जागतिक तिरंदाजी महासंघाला कळवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus threat for ipl 2020 zws
First published on: 06-03-2020 at 03:32 IST