पृथ्वीतलावरील सर्वात सुंदर खेळ असे फुटबॉलचे वर्णन केले जाते, तर भारताप्रमाणे काही मोजक्या राष्ट्रांमध्ये खेळला जाणारा क्रिकेट हा खेळसुद्धा आपली लोकप्रियता विविध देशांमध्ये पसरवत आहे. काही दिग्गज खेळाडूंनी फुटबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळांचे ऋणानुबंधाचे नाते जपल्याचे इतिहास सांगतो. याचप्रमाणे अनेक व्यावसायिक फुटबॉल क्लब्सची सुरुवात क्रिकेट क्लबने झाल्याचे सिद्ध होते. केनिंग्टन येथील द ओव्हल हे क्रिकेटमधील एक नावाजलेले स्टेडियम. १८७०मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद याच ओव्हलने सांभाळले होते. तसेच १८७२ ते १८९२ या कालखंडात एफए चषक फुटबॉल स्पध्रेचे २२ सामने या मैदानावर झाले होते. विवियन रिचर्ड्स, इयान बोथम या महान क्रिकेटपटूंना फुटबॉलमध्येही रस होता, तर डेनिस कॉम्पटन, जेफ हर्स्ट यांच्यासारख्या दिग्गज फुटबॉलपटूंना क्रिकेटचा लळा होता. दोन्ही खेळांची आवड जोपासणाऱ्या या काही फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटूंचा घेतलेला वेध –
ख्रिस बाल्डेरस्टोनमहान फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक बिल शँकी यांनी ख्रिस बाल्डेरस्टोन यांच्यातील गुणवत्ता सर्वप्रथम हेरली आणि त्याला हडर्सफिल्ड टाऊन संघासाठी करारबद्ध केले. मग १९६६पासून तो चार्लिस्ले युनायटेडसाठी खेळू लागला. या संघासाठी ख्रिस सुमारे ४०० सामने खेळला. १९७४पासून या संघाला प्रथम श्रेणी दर्जा मिळाला. ख्रिसची क्रिकेट कारकीर्दसुद्धा महत्त्वपूर्ण ठरली. लिस्टरशायर संघाचे तो प्रतिनिधित्व करू लागला. लिस्टरशायरने १९७२मध्ये बेन्सन आणि हेजेस चषक तर १९७५मध्ये काऊंटी अजिंक्यपदावर नाव कोरले. याशिवाय १९७६मध्ये ख्रिसने दोन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. वयाच्या ६०व्या वर्षी ख्रिसचे कर्करोगामुळे निधन झाले.
विवियन रिचर्ड्सक्रिकेटमधील सार्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांच्या पंक्तीत महान खेळाडू विवियन रिचर्ड्सचे स्थान आहे. १९७४ ते १९९१ या १७ वर्षांच्या कालखंडात रिचर्ड्सने वेस्ट इंडिजच्या क्रिकेटला वैभवाचे दिवस दाखवले. याच व्हिवचे फुटबॉलवरसुद्धा जिवापाड प्रेम होते. अँटिग्वाच्या राष्ट्रीय संघाचेसुद्धा त्याने प्रतिनिधित्व केले होते. १९७४च्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या पात्रता फेरी अँटिग्वा संघाने आपले चारही सामने गमावले. त्रिनिदाद आणि टोबॅगोने त्यांचा ११-० असा धुव्वा उडवला, तर सुरिनामने त्यांना ६-० असे हरवले. या अभियानात विवियन अँटिग्वा संघाकडून खेळला होता. पण फुटबॉलपेक्षा व्हिवची क्रिकेट कारकीर्द अधिक गौरवशाली ठरली.
स्टीव्ह ओग्रिझोव्हिकस्टीव्ह ओग्रिझोव्हिकने आपल्या फुटबॉल कारकीर्दीला प्रारंभ श्रॉसबरी टाऊनकडून केला. मग लिव्हरपूलतर्फे चार सामन्यांत प्रतिनिधित्व केल्यानंतर कोव्हेंट्री सिटी संघासाठी तो ५००हून अधिक सामने खेळला. ओग्रिझोव्हिक श्रोपशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेटसुद्धा खेळला. १९८०मध्ये नॅट वेस्ट चषक सामनेही तो खेळला. वेस्ट इंडिज संघ त्यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यावर आला असताना स्टीव्हने विवियन रिचर्ड्सचा त्रिफळा उडवण्याची किमया साधली होती.
फिल निलेव्यावसायिक फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू म्हणून नाव कमावणारा फिल निले हा कदाचित अखेरचा खेळाडू. फुटबॉल लीगमध्ये फिलची व्यावसायिक कारकीर्द बहरली नाही, परंतु क्रिकेटमध्ये त्याला चांगले यश मिळाले. १९८७ ते १९८९ या कालखंडात फिलने वॉर्केस्टरशायर संघाचे नेतृत्व करताना चार काऊंटी अजिंक्यपदे जिंकून दिली. यापैकी दोन एकदिवसीय सामन्यांच्या संडे लीगची होती. १९९२मध्ये निवृत्ती पत्करल्यापासून फिल क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
ब्रायन क्लोसयॉर्कशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा ब्रायन क्लोस इंग्लंडचा यशस्वी कर्णधार ओळखला जातो. इंग्लंडचा सर्वात युवा कसोटीपटू म्हणून त्याला खूप महत्त्व होते. सुमारे ३० वष्रे त्याने क्रिकेटची सेवा केली. परंतु त्याअगोदर फुटबॉलपटू म्हणून कारकीर्द घडवण्याचा त्याने प्रयत्न केला होता. लीड्स युनायटेडसाठी हौशी खेळाडू म्हणून तो करारबद्धही होता. १९४८मध्ये स्कॉटलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने इंग्लंड युवा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. क्लोसने २२ कसोटी, ३ एकदिवसीय सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय ७८६ प्रथम श्रेणी सामनेही तो खेळला आहे.
विल्यम फॉल्के ऊर्फ फॅटीसहा फूट ४ इंच इतकी उंची आणि १५२ किलो वजन अशी देहयष्टी लाभलेला विल्यम फॉल्के हा शेफिल्ड युनायटेड आणि चेल्सीचा एक दिग्गज गोलरक्षक. याचप्रमाणे इंग्लंड फुटबॉल संघाचेही त्याने प्रतिनिधित्व केले होते. १९०२मध्ये एफए चषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम सामन्यानंतर संतप्त झालेला विल्यम रेफ्रीला मारण्यासाठी त्याच्या घरी गेला. त्यावेळी रेफ्री कपाटात लपून बसला. परंतु एफए अधिकाऱ्यांनी रेफ्रीला वाचवले. विल्यम १९००साली डर्बिशायर क्रिकेट क्लबसाठी काही प्रथम श्रेणी सामनेसुद्धा खेळला होता.
इयान बोथमक्रिकेटविश्वातील एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून इयान बोथम ओळखला जातो. पण बोथमचा क्रिकेटप्रमाणेच फुटबॉलकडेही कल होता. १९७९ ते १९८५ या कालखंडात शूनथॉर्पे युनायटेड संघाकडून तो बिगरकरारबद्ध खेळाडू म्हणून ११ सामने खेळला. तसेच योविल टाऊन संघाचेही त्याने प्रतिनिधित्व केले. शूनथॉर्पे संघातील सहकाऱ्यांसोबत इयान रात्री पार्टी साजरी करत असताना झालेल्या चकमकीमुळे त्याला अटक करण्यात आली. इंग्लिश संघ त्यावेळी वेस्ट इंडिजच्या महत्त्वाकांक्षी दौऱ्यावर जाणार होता. तेव्हा इयानला बरेचसे सामने गमवावे लागले होते.
जेफ हर्स्टफिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक झळकावण्याची किमया साधणारा एकमेव अवलिया म्हणजे जेफ हर्स्ट. जेफने १९६२मध्ये इसेक्स संघाचेही प्रतिनिधित्व केले, पण त्याला पुरेसे यश मिळाले नाही. मात्र पुढील दोन हंगामात त्याने इसेक्सच्या ‘ब’ संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र जेफने फुटबॉलकडेच लक्ष केंद्रित केले आणि १९६६मध्ये त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. १९६६ ते १९७२ या कालखंडात जेफने ४९ सामन्यांत देशासाठी २४ गोल झळकावले आहेत.
डेनिस कॉम्पटनडेनिस आणि लेस्ली कॉम्पटन या दोन्ही भावांनी फुटबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळांमध्ये आपला ठसा उमटवला. अर्सेनल संघाकडून डेनिस ५०हून अधिक सामने खेळला. दुसऱ्या महायुद्धामुळे त्याची फुटबॉल कारकीर्द संपुष्टात आली. त्याच्या खेळाचे अपरिमित नुकसान झाले. सेनादलात नोकरीला असल्यामुळे त्याला भारतात पाठवण्यात आले. सुदैवाने होळकर संघाकडून रणजी चषक सामने खेळण्याची त्याला परवानगी देण्यात आली. इंग्लिश क्रिकेट इतिहासात डेनिस कॉम्पटनचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्याने ७८ कसोटी सामन्यांत १७ शतकांसह ५८०७ धावा केल्या आहेत. कॉम्पटन आणि ऑस्ट्रेलियाचा किथ मिलर या दोघांचेही फुटबॉल आणि क्रिकेटवर विलक्षण प्रेम. २००५पासून अॅशेस क्रिकेट स्पध्रेतील मालिकावीराला कॉम्पटन-मिलर पदक दिले जाते. १९९७मध्ये कॉम्पटनने जगाचा निरोप घेतला.
अँडी गोरॅमअँडी गोरॅमचा गुणी गोलरक्षक म्हणून नावलौकिक होता. परंतु फुटबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळांसाठी त्याने स्कॉटलंडच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले. स्कॉटलंडच्या क्रिकेट संघासाठी तो चार सामने खेळला, तर देशाच्या फुटबॉल संघासाठी तो ४३ सामने खेळला. १९९१मध्ये रेंजर्स फुटबॉल संघाने अँडीच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली. दुखापतीच्या भीतीने त्याच्यावर ही बंधने घालण्यात आली होती.