वृत्तसंस्था, बर्मिगहॅम : सलामी फलंदाज स्मृती मानधनाच्या (४२ चेंडूंत नाबाद ६३) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर आठ गडी आणि ३८ चेंडू राखून दिमाखदार विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना १८ षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानने दिलेले १०० धावांचे लक्ष्य भारताने ११.४ षटकांतच २ गडय़ांच्या मोबदल्यात   गाठत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

आव्हानाचा पाठलाग सलामी फलंदाज शफाली वर्मा (१६ धावा) आणि मानधना यांनी पहिल्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारी केली. शफाली माघारी परतल्यानंतर मेघनाने (१४ धावा) मानधनाला चांगली साथ दिली. मग मानधनाने जेमिमा रॉड्रिग्जच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी, पाकिस्तानचा डाव ९९ धावांवरच आटोपला. सलामी फलंदाज मुनीबा अली (३२ धावा) आणि आलिया रियाझ (१८ धावा) वगळता इतर कोणालाही फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून स्नेह राणा (२/१५) आणि राधा यादव (२/१८) यांनी चांगली गोलंदाजी केली. भारताचा पुढील सामना ३ ऑगस्टला बार्बाडोसशी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : १८ षटकांत सर्वबाद ९९ (मुनीबा अली ३२; स्नेह राणा २/१५, राधा यादव २/१८) पराभूत वि.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत : ११.४ षटकांत २ बाद १०२ (स्मृती मानधना नाबाद ६३, शफाली वर्मा १६; तुबा हसन १/१८)